खेड: पाच वर्षापूर्वी खेड तालुक्यातील सुकिवली येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याप्रकरणी बुधवारी एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आहे. खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
खेड तालुक्यातील सुकिवली गावातील चव्हाणवाडी येथे १९ जुलै २०१८ रोजी १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. त्यानंतर शौचालयाच्या टाकीमध्ये तिचा मृतदेह लपवण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सूर्यकांत नवनाथ चव्हाण या आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला होता. हा आरोपी देखील सुकिवली गावातील होता आणि मुलीच्या नात्यात होता.
या प्रकरणाची सुनावणी खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होती.
बुधवारी या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एल. निकम यांनी आरोपी सूर्यकांत चव्हाण याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. खेडचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी गावकऱ्यांनीही सरकारी वकिलांचा सत्कार करून गौरव केला.
या प्रकरणात सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद आणि सबळ पुरावे तपासून या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनंतर तब्बल पाच वर्षानंतर आरोपीला फाशीची शिक्षा
सुनावण्यात आली आहे.