चिपळूण : चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या हायटेक धर्तीवर पुनर्बांधणीचे काम कित्येक वर्षानंतर सुरू झाले असले तरी त्यास गती न मिळाल्याने अखेर हे काम गेल्या चार दिवसांपासून पुन्हा थांबले आहे. विशेष म्हणजे प्रारंभ झालेल्या प्रत्यक्ष कामापासून स्वच्छता व पायासाठी कॉंक्रीटीकरण इतकीच कामे करण्यात आली. असे असताना पावसाळ्यापूर्वी या बसस्थानकाचे काम पूर्णत्वास जाईल, असा प्रश्न पुढे येवू लागला आहे.
येथील मध्यवर्ती बसस्थानकाची जीर्ण इमारत तोडून त्याठिकाणी नव्याने सुसज्ज अशा हायटेक बसस्थानकाच्या बांधकामास खर्या अर्थाने प्रारंभ झाला. सुरूवातीपासून पूर्वीच्या ठेकेदाराने सातत्याने चालढकल केल्याने या बसस्थानकाच्या बांधकामाचा पूर्णतः बट्ट्याबोळ उडाला असून पहिल्या ठेकेदाराने इतक्या वर्षात इमारतीचा पायादेखील पूर्ण केलेला नाही. परिणामी गती न घेतलेलेे या बसस्थानकाचे काम कित्येक वर्षे बंद राहिले. यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्याला सवडीनुसार स्थानिक आगारप्रमुखांना निवेदन देवूनही त्यावर कोणताच परिणाम न झाल्याने कित्येक वर्षे बांधकाम बंद राहिले. हे बसस्थानक झाडीझुडुपाने वेढले होते. याचा कमालीचा त्रास प्रवाशांसह स्थानिक आगार प्रशासनाला सहन करावा लागत होता. याप्रश्नी शिवसेना तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेत पाठपुरावा केल्याने पूर्वीच्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्या जागी सातारा येथील नव्याने ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली.
नव्याने ठेकेदाराने प्रत्यक्ष बस्थानकाची पाहणी केल्यानंतर पहिल्यांदा अर्धवट बांधकामावर वाढलेली झाडीझुडुपे काढली. यातूनच खर्या अर्थाने बसस्थानकाच्या पुनर्बांधणीला गती येईल अशीच चिन्हे निर्माण झाली होती. असे असताना कित्येक वर्षानंतर प्रत्यक्ष प्रारंभ झालेल्या बसस्थानकाच्या पुनर्बांधणी कामाला म्हणावी तशी गती आलेली नाही.