किल्ले रायगडावर उत्खननात ‘यंत्रराज’ सापडले…

Spread the love

रायगड- किल्ले रायगडावर भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खननात ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा पुरावा सापडला आहे. या उत्खननात ‘यंत्रराज’ अर्थात सौम्ययंत्र (Astrolabe) हे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण सापडल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली असून ही पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले की, खगोलशास्त्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते, याबाबतचा हा महत्त्वपूर्ण पुरावा आहे. हे उपकरण ग्रहताऱ्यांचा अभ्यास, दिशा शोधणे आणि वेळ मोजणे यासाठी वापरले जात असे. त्याच्या सहाय्याने अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त आणि विषुववृत्तांचा अभ्यास सहज शक्य होतो.

उत्खनन कार्य मागील तीन-चार वर्षांपासून रायगड किल्ल्यावर विविध भागात सुरू आहे — रोपवेच्या मागच्या बाजूस, कुशावर्त तलावाजवळ, बाजारपेठ व जगदीश्वर मंदिर परिसरात हे कार्य केले जात आहे. यामधीलच एका ठिकाणी, म्हणजे कुशावर्त तलावाच्या वरील बाजूस व वाडेश्वर मंदिराच्या मधल्या भागात या यंत्रराजाचा शोध लागला.

या यंत्रावर कोरलेल्या अक्षरांमध्ये “मुख” आणि “पूंछ” असे स्पष्ट उल्लेख आहेत, जे उत्तर-दक्षिण दिशांचा अंदाज लावण्यासाठी वापरले जात असावेत. तसेच मध्यभागी कोरलेले प्राणी — कासव किंवा सापासारखे — हे प्राचीन भारतीय शिल्प परंपरेचा भाग असण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

या सापडलेल्या यंत्रामुळे रायगडचा इतिहास अधिक खोलवर समजण्याची संधी निर्माण झाली असून भविष्यातील संशोधनासाठी हे एक अमूल्य ठेवा ठरणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page