
सांगली (प्रतिनिधी) : शिंदे- फडणवीस सरकार वाचले असले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, कारण राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत, हे सुप्रिम कोर्टाने सांगितले आहे. शिंदे सरकार वाचले हा त्यांच्या भोवती असणाऱ्यांसाठी क्षणिक आनंद असू शकतो , पण हे सगळं अवैध आहे. त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगितले.
ते म्हणाले, “भारतीय जनता पक्षाने केलेली युती कशी चुकीची आहे आणि घटनेची पायमल्ली कशी झालेली आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला आता सुप्रिम कोर्टाने आता सांगितलेले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी केलेली कटकारस्थाने, चुकीच्या पद्धती, उद्धव ठाकरे यांना राजीनामा देण्यासाठी परिस्थिती निर्माण केली, हा राजीनामा दिला गेला नसता तर आम्ही सरकार पुनर्स्थापित केलं असतं असे सुप्रिम कोर्टाचे मत आहे, यातून स्पष्ट दिसते की सुप्रिम कोर्टाच्या मनात काय आहे. त्यामुळं सध्या सत्तेत असणारे सरकार अवैध आहे, घटनाबाह्य आहे, हे सुप्रीम कोर्टच्या पाच न्यायाधीशांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितले आहे.
उद्धव ठाकरे हे निष्ठुर नाहीत, ज्यावेळी आमदार सोडून जात होते, त्याचवेळी त्यांना राज्यपालांनी संख्याबळ सिद्ध करायला लावले, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती, राजीनामा देणे ही चूक होती, हे शरद पवार साहेब यांनी यापूर्वी सांगितले आहे, आज ते पुन्हा सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.”