मंडणगड :- म्हाप्रळ-आंबेत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना, ३१ ऑगस्टला सायंकाळी आठ वाजण्याच्यादरम्यान जुन्या कॉलमचा कठडा कोसळल्याने त्याच्या आधारावर उभे करण्यात आलेल्या नवीन स्लॅबचे गर्डरकरिता लावण्यात आलेले सेंट्रिंग कोसळून सावित्री नदीच्या पात्रात पडले. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होण्याच्या सर्व शक्यता मावळल्या आहेत.
गेल्या एक वर्षापासून आंबेतकडील बाजूने दुसऱ्या क्रमांकाच्या पिलरचे दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग माणगाव यांच्या माध्यमातून सुरू आहे. या संदर्भात तालुक्यातील विविध संस्था, सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी वेळोवेळी आंदोलन करत पूल लवकरात लवकर सुरू कऱण्याची मागणी केल्यानंतर आवश्यक तो वेळ घेऊन बांधकाम विभागाने ऑगस्ट महिन्यात म्हाप्रळ-आंबेत पूल गणेशोत्सवाच्या आधी सुरू करण्याचे जाहीर केले होते.
जुन्या पिलरला पर्याय म्हणून बाजूने आठ नवीन पाईल उभे करण्यात आले होते. त्यावर पाईल कॅप टाकल्यानंतर गर्डरचे काम सुरू असताना गर्डरसाठी बांधण्यात आलेले सेंट्रिंग काम सुरू असताना कोसळले. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अचानक घडलेल्या नवीन घटनाक्रमामुळे नियोजित वेळेत काम पूर्ण होणे जवळजवळ अशक्य झाले आहे.
जुन्या पिलरच्या काही भागाच्या कोसळण्याच्या आवाजामुळे परिसरात एकच घबराट उडाली .