भारतीय क्रिकेट संघाच्या एका स्टार खेळाडूसोबत फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवसोबत फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. क्रिकेटपटूचे पूर्व मॅनेजर शैलेश ठाकरे यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे. नागपूरच्या डीसीपी अश्विनी पटेल यांनी सांगितले की, पूर्व मॅनेजरने मालमत्ता खरेदीच्या नावाखाली उमेश यादवची ४४ लाख रुपयांची फसवणूक केली. उमेश यादवच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर यादवने १५ जुलै २०१४ रोजी शैलेशला आपला मॅनेजर बनवले. काळानुसार यादवचा शैलेशवरचा विश्वास वाढत गेला. उमेश यादवचे आर्थिक व्यवहार तो पाहू लागला. यादवच्या आयकर, आर्थिक काम आणि बँक खाते व इतर बाबींची जबाबदारी शैलेश याच्याकडेच होती.
दरम्यान उमेश यादव नागपुरात प्रॉपर्टीच्या शोधात होता. त्याने हे शैलेशला सांगितले. शैलेशने मालमत्तेची किंमत ४४ लाख रुपये असल्याचे कळवले. उमेश यादवने शैलेशच्या खात्यात ४४ लाख रुपये जमा केले. परंतु शैलेशने यादवच्या नावावर मालमत्ता खरेदी करण्याऐवजी ती स्वतःच्या नावावर करून घेतली.
फसवणुकीबद्दल लक्षात येताच उमेशने मालमत्ता आपल्या नावावर करण्यास सांगितले. मात्र शैलेशने नकार दिला. उमेश यादवने पैसे परत करण्याची मागणी केली. तसेच शैलेशने पैसे देण्यासही नकार दिला. अखेर उमेश यादवने पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.