चिपळूण : चिपळूण तालुक्यातील दळवटणे भुवडवाडी येथील शेतीतील फासकीमध्ये अडकलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाच्या बचाव पथकाला यश आले.
चिपळूण तालुक्यातील दळवटणे भुवडवाडी येथील संतोष भुवड आणि धोंडू भुवड यांच्या शेतीमध्ये फासकीत बिबट्या अडकला असल्याची माहिती संदीप यशवंत सुगदरे यांनी दूरध्वनीद्वारे वनविभागला दिली होती. ही माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे बचाव पथक रेस्क्यूसाठी आवश्यक साहित्यासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
या बिबट्याला काही वेळातच सुखरूप बाहेर काढण्यात आलं. फासकीमध्ये अडकलेल्या बिबट्याला बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पिसे यांनी त्याची पाहणी केली. त्यावेळेला हा बिबट्या नर जातीचा असून त्याचं अंदाजे वय साडेतीन वर्ष असल्याचे आणि तो सुस्थितीत असल्याचे डॉ. पिसे यांनी सांगितलं. त्यानंतर या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याबाबतचा त्यांनी अहवाल दिला. त्यानुसार वनविभागाच्या बचाव पथकाने या बिबट्याला सुरक्षित रित्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं.
जाहिरात :