
राजापूर :- पावसाने सोमवारी रात्रीपासुन जोर धरल्याने आज पहाटे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला. पुराचे पाणी जवाहर चौकातील राधाकृष्ण कोल्ड्रिंक्स पर्यंत पोहोचले. जनजीवन विस्कळीत झाले आहे. शीळकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेला असुन शहरातील बहुतांश भाग पुराच्या पाण्याखाली गेला आहे. तर व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवला आहे.
सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन कोदवली नदीचे पाणी शहर बाजारपेठेत शिरले . शहरातील भटाळी, गुजराळी, वरचीपेठ, चिंचबांध, आंबेवाडी आदी भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. आज मंगळवारी पहाटे पुराच्या पाण्याचा जोर जास्तच वाढल्याने राजापूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पथ हा रस्ता पुर्णतः पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील व्यापाऱ्यांनी व रहिवाशांनी आपले सामान सुरक्षित स्थळी हलवले आहे.

सकाळी सहा वाजता शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी भरल्याने शहरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली . आजच्या पावसाने तालुक्यातील अनेक भागात पुराचे पाणी शिरल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान अणुस्कुरा घाटात दरड कोसळली असून घाटमाथ्यावर जाणारी वाहतूक बंद झाली आहे. प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ यंत्रणा पाठवून दरड बाजूला करण्याचे काम हाती घेतले आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर