संगमेश्वरवासीयांचा लढा सुरूच..

Spread the love

संगमेश्वर रोड स्थानकावर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेस गाडीला थांबा मिळविण्यासाठी मागणी…

जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | मे ०४, २०२३.

कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर हे महत्त्वाचे ठिकाण. या स्थानकावर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेस गाडीला थांबा मिळावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

कोकण रेल्वेच्या स्थापनेला 24 वर्ष पूर्ण झाली. दरवर्षी संगमेश्वर प्रवाशांमुळे कोकण रेल्वेला चांगले उत्पन्न मिळते. ह्या वर्षी प्रवाशांच्या तिकीट खरेदीतून कोकण रेल्वेला 4 करोड 93 लाख 71 हजार 457 एवढे उत्पन्न मिळाले आहे. असे असूनही संगमेश्वर वासीयांना असुविधेशी सामना करावा लागत आहे.

कोकण रेल्वे हा रेल्वेच्या इतिहासातील एक चमत्कार आहे, असे म्हंटले जाते. रेल्वेचे स्वप्न साकार झाले खरे, पण कोकण रेल्वेचा खरा लाभ कोकणभूमिपुत्रांना मिळतो का? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. कोकणरेल्वेचा जास्तीत जास्त उपयोग कोकणवासियांना व्हावा यासाठी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या वतीने गेली तीन वर्षे नेत्रावती-मत्स्यगंधा या एक्स्प्रेस गाड्यांना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकामध्ये थांबा मिळावा यासाठी लढा चालू आहे. मात्र याची सरकारी पातळीवर कोणतीही दखल अद्याप घेतली गेली नाही.

या मार्गावरील गाडी क्र. 11099/11100 “लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेस गाडीला संगमेश्वररोड” स्थानकावर थांबा मिळावा याची जोरदार मागणी केली जात आहे..

संगमेश्वर तालुक्याला पुरातन इतिहास आहे. कोकणच्या विकासाची दारे कोकण रेल्वेच्या रूपाने उघडी झाली. अनेक गाड्या या मार्गावरून धावू लागल्या परंतु सध्या संगमेश्वरसाठी एक्सप्रेस गाड्या फक्त तीनच आहेत. या गाड्यांचे तिकीट कायम फुल असते आणि गाड्यांचे रिझर्वेशन तीन मिनिटांत संपुष्टात कसे होते हा संशोधनाचा विषय आहे. प्रचंड मागणी असताना सुद्धा संगमेश्वरकरांना कोकण रेल्वेचा फायदा होताना दिसत नाही.

कोकण रेल्वेच्या सर्व विभागीय कार्यालय, रेल्वे मंत्रालय, सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे मागण्यांचे अर्ज अजूनही प्रस्तावित आहेत. परंतु कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.

मुंबई आणि उपनगरात कोकणातील चाकरमान्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र कोकण रेल्वेचा प्रवास मात्र अधिकाधिक खडतर होत चालला आहे. म्हणून निदान आठवड्यातून चार दिवस धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव या गाडीला संगमेश्वर रोड स्थानकामध्ये थांबा मिळाला तर काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळेल. आणि जनतेचा रोष काही प्रमाणात कमी होईल. असे एका पत्रकाद्वारे स्थानिकांनी नमूद केले आहे.

या दरम्यान तीन वर्षापासूनचा नेत्रावती-मत्स्यगंधा एक्स्प्रेस संगमेश्वर रोड स्थानक थांब्यासाठीचा लढा सुरूच राहणार आहे. तोपर्यंत या गाडीला थांबा द्यावा. अन्यथा जनतेच्या संतापाला सामोरे जाण्याची कोकण रेल्वेने तयारी ठेवावी. असेही पत्रकार संदेश जिमन यांनी सांगितले आहे..

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page