पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या चौथ्या दिवशी स्टार नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला दुसरं पदक मिळवून दिलं. आता पाचव्या दिवशी भारताचे कोणते खेळाडू कोणाविरुद्ध आणि कधी खेळणार आहेत. यावर एक नजर टाकू.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 चौथा दिवस भारतासाठी धमाकेदार ठरला. चौथ्या दिवशी भारताचे स्टार नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचं हे दुसरं पदक होतं. आज आम्ही तुम्हाला भारताच्या तिसऱ्या दिवसाचं संपूर्ण वेळापत्रक सांगणार आहोत. तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडू नेमबाजी, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि तिरंदाजीमध्ये देशासाठी चमकदार कामगिरी करताना दिसतील.
*पॅरिस ऑलिम्पिकच्या 5व्या दिवसाचं भारताचं संपूर्ण वेळापत्रक*
*नेमबाजी –* ऐश्वर्य तोमर आणि स्वप्नील कुसळे 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स पुरुष पात्रता स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करतील. या स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी खेळला जाईल. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती ऐश्वर्या या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत 23व्या स्थानावर असून विश्वचषक स्पर्धेत तिची तीन सुवर्णपदकं आहेत. जागतिक क्रमवारीत 62 व्या क्रमांकावर असलेला स्वप्नील प्रथमच ऑलिम्पिकमध्ये उतरणार आहे.
*50 मीटर रायफल 3 पोझिशन्स पुरुष पात्रता (ऐश्वर्य तोमर आणि स्वप्नील कुसळे) – दुपारी 12:30 वा.*
*बॅडमिंटन –* पॅरिसमध्ये सलग तिसरं ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पीव्ही सिंधूचा सामना एस्टोनियाच्या क्रिस्टिन कुबाशी होणार आहे. ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पीव्ही सिंधूकडून विजयाची अपेक्षा आहे. तर सर्वांच्या नजरा 22 वर्षीय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनवर आहेत, जो पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालाय. लक्ष्यने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केलंय. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाच्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीशी भिडणार. या सामन्याकडे सर्वांच्या नजरा असतील. तर एचएस प्रणॉयचा ग्रुप स्टेजच्या सामन्यात व्हिएतनामच्या ड्यूक फाट ले याच्याशी सामना होईल.
*महिला एकेरी गट स्टेज – (पीव्ही सिंधू) – दुपारी 12:50 वाजता*
*पुरुष एकेरी गट स्टेज – (लक्ष्य सेन) – दुपारी 1:40 वाजता*
*पुरुष एकेरी गट स्टेज – (एचएस प्रणॉय) – रात्री 11:00 वाजता*
*टेबल टेनिस –* भारतीय टेबल टेनिसमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या श्रीजा अकुलाचा सामना 32 च्या फेरीत सिंगापूरच्या झेंग जियानशी होणार आहे. अकुलाने अलीकडेच मनिका बत्राचा पराभव करून भारताची नंबर 1 खेळाडू होण्याचा मान मिळविला आहे. प्री-क्वार्टर फायनलमध्ये जाण्यासाठी तिला हा सामना जिंकणं गरजेचं आहे.
*महिला एकेरी 32 ची फेरी – (श्रीजा अकुला) – दुपारी 1:30 वाजता*
*बॉक्सिंग –* पदकाच्या दावेदारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या लोव्हलिना बोर्गोहेनचा सामना नॉर्वेच्या सुनिव्हा हॉफस्टॅडशी होईल. हा सामना जिंकल्यास ती उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल. त्याचवेळी भारतीय बॉक्सर निशांत देवचा सामना इक्वेडोरच्या जोस रॉड्रिग्जशी होणार आहे.
*महिलांची 75 किलो 16 ची फेरी – (लोव्हलिना बोर्गोहेन) – दुपारी 3:50 वाजता*
*पुरुषांची 71 किलो 16 फेरी – (निशांत देव) – दुपारी 12:18 वाजता*
*तिरंदाजी –* सर्वोत्तम भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी एस्टोनियाच्या रीना परनाटविरुद्ध वैयक्तिक स्पर्धेत तिच्या मोहिमेची सुरुवात करेल. तरुणदीपचा सामना 32व्या फेरीत ग्रेट ब्रिटनच्या टॉम हॉलशी होणार आहे.
*महिलांची वैयक्तिक 32 एलिमिनेशन फेरी – (दीपिका कुमारी) – दुपारी 3:56 वाजता*
*पुरुषांची 32 एलिमिनेशन फेरीची वैयक्तिक फेरी – (तरुणदीप राय) – रात्री 9:28 वाजता*