
नाशिक:- लाखो रुपये खर्च करून मिरचीला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने अक्षरशः मिरची उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील वेळापूर येथील शेतकरी एकनाथ कुटे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये आरमार जातीच्या मिरचीची लागवड केली होती.
त्याकरीता त्यांनी सात ते साडे सात हजार रुपये खर्च करुन पिकाला मल्चिंग पेपर व बांबूसह रासायनिक खते असा एकूण दोन ते अडीच लाख रुपये खर्च केला होता. मात्र, ज्यावेळेस मिरची निघण्यास सुरुवात झाली. तेव्हा, मिरचीला बाजारात १५ ते २० रुपये भाव मिळू लागल्याने अक्षरशः या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. यावर शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहे.
दुसरीकडे खतांचे वाढलेले भाव, वातावरणात होत असलेल्या बदल्यामुळे शेतीचे होत असलेले नुकसान यामुळे शेतकरी पार मेटाकुटीला आला आहे. अशात पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने जगण्याचे दुसरे साधन शेतकऱ्याला शोधावे लागत आहे.