
(संगमेश्वर | रविवार | जानेवारी २२, २०२३)
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ योजनेच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम असतानाच ग्रामपंचायत पिरंदवणेकडून मळेवाडी, पिरंदवणे येथे स्थानिकांची कोणतीही परवानगी न घेता अगर कल्पना न देता खोदकाम सुरु करण्यात आले.
स्थानिकांच्या याबाबत असलेल्या शंका विचारात न घेता, मूळ पाईप लाईन सुस्थितीत असताना ती जागा सोडून अन्य ठिकाणी खोदकाम होत आहे. याच समस्येमुळे स्थानिकांचा योजनेच्या अंमलबजावणीस विरोध आहे. मात्र याबाबत सरपंच, ग्रामसेवक व काही सदस्य कोणत्याही प्रकारे स्थानिकांना विश्वासात घेताना दिसत नाहीत.
आज रविवार, दि. २२ जानेवारी रोजी मळेवाडी येथील श्री. सुर्यकांत शंकर मुळ्ये यांचे जमिनीत त्यांच्या अपरोक्ष खोदकाम चालू होते. उपस्थित असणाऱ्या कंत्राटदाराने याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता खोदकाम सुरु केले व तेथे असणारी श्री. मुळ्ये यांची वैयक्तिक पाईपलाईन फोडली. यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. ८२ वर्षे वय असणारे श्री. मुळ्ये व त्यांच्या पत्नी वय ७० वर्षे अचानक पाणी बंद झाल्याने कमालीचे त्रस्त झाले आहेत.
नागरिकांच्या मनामध्ये असणारा संभ्रम दूर व्हावा आणि काम सुरळीत पार पडावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. मात्र काम रेटून नेण्याचे धोरण ठेवल्यामुळे लोकांना नाहक मनस्तापास सामोरे जावे लागत आहे.