
संगमेश्वर /दिनेश अंब्रे – पैसा फंड इंग्लिश स्कूलची शैक्षणिक सहल दिनांक 2 डिसेंबर ते 5 डिसेंबर अशा चार दिवसाच्या कालावधीमध्ये संगमेश्वर ते प्रतिबालाजी, पुणे शिर्डी, शनिशिंगणापूर, छत्रपती संभाजी नगर, येवला, लेण्याद्री, शिवनेरी ओझर, पिंपरी चिंचवड या ठिकाणी जाऊन अत्यंत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाली.यामध्ये 38 विद्यार्थी आणि चार शिक्षक समाविष्ट होते.
सुरुवातीला दोन तारखेला प्रति बालाजी येथे दर्शन घेऊन शिक्षकांनी व मुलांनी पिंपरी चिंचवड येथील विज्ञान केंद्रास भेट दिली.तेथे तारांगण मधील आकाशगंगा आणि ताऱ्यांचे रहस्य विद्यार्थ्यांनी अनुभवले. विज्ञान केंद्रातील विविध प्रकारचे दोनशे उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहिले. सुरुवातीची सायकल ते आत्तापर्यंतची नवीन गाडी याचे इंजिन मुलांना पाहायला मिळाले.
त्यानंतर दुपारी अष्टविनायक मधील रांजणगाव श्री गणेशाचे दर्शन घेऊन सर्वांनी शनिशिंगणापूर येथे जाऊन शनि देवाचे दर्शन घेतले.तेथील आश्चर्यकारक अशा गोष्टी विद्यार्थ्यांना पाहायला मिळाल्या. त्या म्हणजे तेथील घरांना आणि दुकानांना दरवाजे नाहीत.
तेथून वस्तीसाठी विद्यार्थी शिर्डीच्या भक्तनिवासामध्ये पोहोचले. सकाळी सच्चिदानंद सद्गुरु श्री साईबाबांचे आशीर्वाद घेऊन विद्यार्थ्यांनी साईबाबांचे पूर्वकालीन म्युझियम पाहिले व शिर्डीच्या प्रसादालय मध्ये प्रसाद घेऊन छत्रपती संभाजी नगर येथे रवाना झाले.
समृद्धी महामार्गावरून जाताना एक वेगळा आनंद विद्यार्थ्यांच्या मध्ये होता या प्रवासात विद्यार्थ्यांना अजिबात कंटाळा आलेला नाही कारण विद्यार्थ्यांनी अंताक्षरी विविध भजने तसंच गाणी गात डान्स करत आनंद लुटला.
संभाजीनगर येथे गेल्यानंतर ताजमहल ची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा मुलांनी पाहिला. तेथून सिद्धाचल बाग व प्राणी संग्रहालय मुलांनी पाहिले. त्या प्राणी संग्रहालयामध्ये पट्टेरी वाघ, सफेद वाघ, सिंह, विविध प्रकारचे प्राणी मुलांना प्रत्यक्ष पाहायला मिळाले.छत्रपती संभाजी नगर येथे महादेवाचे बारा ज्योतिर्लिंगापैकी बारावे ज्योतिर्लिंग घृणेश्वर मंदिर येथे जाऊन महादेवाचे प्रत्यक्ष दर्शन मुलांनी घेतले.

तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी एलोरा गुहेमध्ये प्रवेश करून तेथील लेणी अनुभवली.तेथील बौद्ध लेणी एक शिल्पकलेचा वेगळा नमुना विद्यार्थ्यांना पहावयास मिळाला. तेथून मुघल शाही मधला दौलताबाद म्हणजेच देवगिरी किल्ल्यावरती मुलांनी फेरफटका मारला.
या किल्ल्यामध्ये एक वेगळा अंधारी मार्ग म्हणजेच भुयारी मार्गातून मुलांनी प्रवेश केला. हा भुयारी मार्ग पूर्वीच्या काळी शत्रूंना आत मध्ये येण्यासाठी तयार केलेला होता व अंधारातून येताना शत्रु वाट सुखाचे व तेथील दगडांवर आपटून मरायचे. किल्ल्यामधून वरून त्यामध्ये गरम तेल व धूर सोडला जायचा.असे नियोजन त्याकाळी या किल्ल्यामध्ये केलेले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वकालीन सर्व वस्तूंचे जतन केलेले म्युझियम विद्यार्थ्यांना पहाव्यास मिळाले. यामध्ये शिवाजी महाराजांच्या वेळेची सर्व शस्त्र, त्यावेळची नाणी, पूर्वकालीन वस्तूंचे विविध नमुने विद्यार्थ्यांना पहावयास मिळाले. खुलताबाद येथे गेल्यानंतर श्री मारुतीरायांचे शयन स्थितीमध्ये असलेले दर्शन तेथे पाहायला मिळाले.

मारुतीरायांचा आशीर्वाद घेऊन येवल्याच्या कापसे पैठणी फाउंडेशन ला मुलांनी भेट दिली. येवल्याची प्रसिद्ध कापसे पैठणी इथे गेल्यानंतर पंतप्रधान सरकार मान्य प्रशिक्षण केंद्रास विद्यार्थ्यांनी भेट दिली.
या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देणारे श्री सुनील पवार हे टेक्स्टाईल इंजिनियर असून जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून त्यांनी आपले शिक्षण पुरे केले व अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण केंद्र तेथे श्री कापसे बंधू यांच्या मार्गदर्शनाखाली ते शिकवीत आहेत.
तेथे मूकबधिर विद्यार्थी व कामगार यांना प्रत्यक्ष पैठणी विणण्याचे प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती श्री बाळकृष्ण कापसे व त्यांचे बंधू यांनी केली आहे.
ज्यामध्ये अनेक मूकबधिर व गरजू लोकांना रोजगार निर्मिती ची संधी उपलब्ध झाली आहे.
तेथील दुसरा प्रकल्प म्हणजे गोशाळा ज्यामध्ये साडेतीनशे गीर गाई आहेत.त्यांचं दिवसाचं दहा लिटर दूध व त्या दुधाचे वेगवेगळे पदार्थ निर्मिती आणि शेणापासून गणपतीच्या मूर्ती व इतर कलाकृती त्यांनी बनवलेल्या आहेत.
गाईंच्या शेणापासून बनवलेल्या पर्यावरण पूरक अशा गणपतीच्या मूर्ती तेथे तयार केल्या जातात. सर्व प्रकल्प मुलांना प्रत्यक्षात पाहायला मिळाले.
या सर्व केंद्रात भेट दिल्यानंतर येवला कापसे फाउंडेशनचे सर्वेसर्वा श्री बाळकृष्ण कापसे व त्यांचे बंधू यांनी सर्वांना 2001 ते 2025 असा 25 वर्षाचा पैठणीचा प्रवास कसा झाला तो विद्यार्थ्यांना समजून सांगितला.
15000 कामगार तेथे आज कामाला असून पंधराशे पैठणीची मशीनरी तेथे एका वेळेस चालते. अतिशय उत्तम अशी समाजसेवा करणारे कापसे बंधूनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
येवल्या वरून विद्यार्थी व शिक्षक लेण्याद्रीला पोहोचले. लेण्याद्रीला श्री गणेशाच्या पायथ्याशी असलेल्या भक्त निवास मध्ये वस्ती करून विद्यार्थ्यांनी सकाळीच लेण्याद्रीच्या गिरजात्मक श्री गणेशाचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याला भेट दिली व तेथून अष्टविनायक मधील तिसरा गणपती ओझर या श्री गणपतीचे दर्शन घेऊन पुण्यामध्ये शिक्षक व विद्यार्थी पोहोचले.
पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापलेल्या ” लाल महल ” या वास्तूला भेट दिली व दगडूशेठ हलवाईच्या श्री गणेशाचे दर्शन घेऊन विद्यार्थी कात्रज मधील राजीव गांधी प्राणी संग्रहालय पाहायला गेले.
त्यावेळी तेथील विविध प्रकारचे साप असलेले सरपोद्यान, मगर, सुसर विविध प्रकारचे प्राणी, वाघ, हत्ती, कोल्हे, लांडगे, गीर गाई, काळवीट इत्यादी विविध प्रकारच्या प्राण्यांचा अनुभव प्रत्यक्षरीता मुलांना पहायला मिळाले आणि संध्याकाळी परतीचा प्रवास सुरू करून विद्यार्थी भोजन करून रात्री आपापल्या घरी सुखरूप पोहोचली.
देवरुख आगारांमधील लालपरी शैक्षणिक सहलीला घेऊन आले ते चालक श्री विनय पवार यांनी अत्यंत छान प्रकारे गाडी चालवून विद्यार्थ्यांमध्ये समरस होऊन व विद्यार्थ्यांची काळजी घेऊन प्रवास सुखरूप केला.
विद्यार्थ्यांना घडविण्यामध्ये शैक्षणिक उपक्रम म्हणून शैक्षणिक सहलीचे आयोजन प्रशालेमध्ये दरवर्षी केले जाते व विद्यार्थ्यांना अभ्यासातील साहित्यिक, विज्ञान, रोजगार निर्मिती प्रशिक्षण केंद्र पुराकालीन ऐतिहासिक वास्तू दाखवण्यामागे संस्थेचा व प्रशालेचा उद्देश हाच असतो की विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये प्रत्यक्ष पाहून अधिक भर पडावी.
शैक्षणिक सहलीचे नियोजन आणि व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल शेट्ये, सचिव धनंजय शेट्ये सर, मुख्याध्यापक खामकर सर, मार्गदर्शक शिक्षक वंजारे सर, ढोर्लेकर सर, कोकाटे मॅडम, निमले मॅडम यांनी अत्यंत नियोजनपूर्वक केले व पालकांचा विश्वास आणि सहकार्य यामुळे चार दिवसाची शैक्षणिक सहल अत्यंत आनंदात, उत्साहात व शिस्तीत पार पडली. यासाठी संस्थेतर्फे तसेच संगमेश्वर पंचक्रोशीतून व पालकांकडून शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर