
१ सप्टेंबरला सकाळी साडेअकरा वाजता दोरीने गळा आवळून स्वप्नाली सावंत यांचा खून केल्याची आरोपीने दिली होती कबुली
रत्नागिरी (प्रतिनिधी) : माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत खून प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. पोलिसांनी स्वप्नाली सावंत यांच्या घराजवळून जप्त केलेल्या मानवी अवशेषांचा डीएनए अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यानुसार तो मृतदेह स्वप्नाली सावंत यांचाच असल्याचे डीएनए अहवालात उघड झाले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याला पुष्टी दिली आहे. त्यामुळे ही केस भक्कम होणार असा पोलिसांचा अंदाज आहे.
तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन हा खून झाल्याचे जाहीर केले होते. स्वप्नाली सुकांत सावंत यांचा मृतदेह जाळल्यानंतर राख गडबडीत गोणीत भरणे संशयित आरोपींना तेव्हा महागात पडले होते. त्यांच्या एका चुकीमुळे पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत ३ दिवसात या खून प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. मृतदेहाची ६ ते ८ हाडे आणि कुजलेले मांस पोलिसांना सापडले आहे तसेच एक दातही मिळाला होता. डीएनए चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबला ते पाठवण्यात आले होते.
१ सप्टेंबरला सकाळी साडेअकरा वाजता दोरीने गळा आवळून स्वप्नाली सावंत यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह लपवून ठेऊन रात्री पेंढा आणि पेट्रोलच्या साहाय्याने जाळून पुरावा नष्ट करण्यासाठी ती राख समुद्रात टाकल्याची कबुली संशयित मुख्य आरोपी सुकांत उर्फ भाई सावंत यांच्यासह तिघांनी दिल्याचे डॉ. गर्ग यांनी सांगितले होते.