
ठाणे : तीन वर्षापूर्वी संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेणारा कोरोना विषाणू नव्या रूपात पुन्हा एकदा अवतरला आहे. आस्तेकदम त्याने भारतात शिरकाव करून महाराष्ट्रातही आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. अलिकडेच ठाण्यातील कळवा येथे कोरोनाने एका २१ वर्षीय मुलाचा बळी गेल्याची बातमी ताजी असतानाच, कल्याणमध्ये कोरोनाने एका महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
दिवसेंदिवस राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबई आणि ठाणे पाठोपाठ कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान, कल्याणमध्ये एका महिलेचा कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवलीमध्ये मागील आठवड्यात ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यापैकी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. इतर दोन कोरोनाबाधित रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर एका रुग्णावर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर एकाला उपचार देऊन सोडण्यात आलं आहे.
या घटनेमुळे महाराष्ट्रात कोरोनाचे २ बळी गेले असून, आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या २०९ वर पोहोचली आहे.