
संगमेश्वर- वाढत्या तापमान वाढीमुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे पाणी टंचाईची झळ सगळीकडेच बसत आहे. देवरूख शहराचा विस्तार खूप मोठा आहे. या शहराला पाणी मुबलक प्रमाणात मिळावे व भविष्यात पाणी
टंचाई निर्माण होवू नये यासाठी देवरूख नगरपंचायतीमार्फत ५५ कोटीची नळपाणी योजना प्रस्तावीत आहे. देवरूखवासियांना अखंड पाणीपुरवठ्यासाठी बावनदीवर तब्बल साडेसात कोटी रूपये खर्च करून धरण बांधण्यात येणार आहे. यातून होणाऱ्या पाणी साठ्यातून देवरूखवासियांना मुबलक प्रमाणात पाणी मिळून पाणीप्रश्न कायमचा सुटण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज शनिवारी बावनदी येथील भूमिपूजन कार्यक्रमात केले.
बावनदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते आज शनिवारी करण्यात आला. यावेळी ते बोलताना म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्राची भुमी आहे. आपण या भुमीत राहतो हे आपले भाग्य आहे. संगमेश्वर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबांचा पदस्पर्श झाला आहे. देवरुखमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी डीपीडीसीमधून एक कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. पाणी टंचाईच्या समस्येला महिला वर्गाला सामोरे जावे लागते. निवडणुकीच्या वेळी पाच वर्षानंतर पाणी देण्याचे आश्वासन दिले जाते आणि मतं मिळविली जातात हे
थांबविण्यासाठी नळपाणी योजना मंजुर करण्यात आली आहे. देवरूख नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जात आहेत. पाणी पुरवठा योजनेबरोबर नगरपंचायतीची इमारतीचे काम करण्यासाठी चार कोटीची आवश्यकता होती तो निधी नगरपंचायतीला दिल्याने आज सुसज्ज अशी देवरूख नगर पंचायतीची इमारत उभी राहणार आहे. निवडणुकीच्या कालावधीत केवळ राजकारण केले पाहिजे. इतर वेळी आपल्या शहराच्या विकासासाठी आपण एकत्र आले पाहिजे. येणाऱ्या काळात नगरपंचायतीमध्ये विचारांची सत्ता आली पाहिजे असे ना. सामंत यांनी सांगितले.
यावेळी अभिजीत शेट्ये यांनी पाणीपुरवठा योजनेमुळे पुढील ३० वर्ष देवरूख शहराला पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही असे सांगितले. तर देवरूख शहराचा डीपी आराखडा तयार करण्यात येत आहेत यातील कामांना मंजुरी
मिळून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, बाबु म्हाप, अभिजीत शेट्ये, सौ. मृणाल शेट्ये, प्रसाद सावंत, सचिन मांगले, वैभव पवार, बाळू ढवळे, प्रफुल्ल भुवड, हनिफ हरचिरकर, वांझोळे सरपंच निधी पंदेरे, मुरादपूर सरपंच दिक्षा बांडागळे, तहसिलदार अमृता साबळे, रत्नागिरी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता गणेश सलगर आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी केले. तर सर्वांचे आभार श्री. सरोदे यांनी मानले.
अमली पदार्थांची विक्री आणि सेवन कोण करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. आपली भावी पिढी कोण बिघडवित असेल तर त्याला शिक्षा करणे आवश्यक आहे. रत्नागिरी तालुक्यात अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या ८ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. अमली पदार्थांचे उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. ९० दिवसात अमली पदार्थ मुक्त असा जिल्हा करूया असे आवाहन यावेळी ना. सामंत यांनी केले.