मुंबई- देशभरात महागाईचा भडका उडाला असून चांगल्या दर्जाचे गहू, ज्वारी, बाजरीच्या दरांनी पन्नाशी गाठली आहे. तर उडीद डाळ, मूगडाळ, तूरडाळींचा भाव होलसेल मार्केटमध्ये शंभरीपार गेला आहे. यामुळे गृहिणींचे बजेट चांगलेच कोलमडणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याने खर्च कसा भागवायचा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
डाळींचे दर शंभरीपार
राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून ज्वारी, बाजरी, गहू, डाळी, कडधान्यांच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर ज्वारीचे दर २२ ते २९ रुपयांवरून थेट २८ ते ५० रुपयांवर गेले आहेत.
अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान
दरम्यान यापुढेही शेतकऱ्यांना शेतमालाची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे कारण विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसासाठी यलो अलर्टचा इशारा दिला आहे.