
पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, भिवंडी येथून दांपत्याला घेतले ताब्यात; आर्थिक परिस्थितीमुळे उचलले टोकाचे पाऊल..
पनवेल : शहरातील तक्का परिसरात शनिवारी (दि.28) सकाळी एका प्लास्टिकच्या बास्केटमध्ये सापडलेल्या नवजात अर्भकाच्या आई-वडिलांचा शोध लावण्यात पनवेल शहर पोलीस आणि गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाला २४ तासांच्या आत यश आले आहे. या हृदयद्रावक प्रकरणात पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत भिवंडी येथून संबंधित दांपत्याला ताब्यात घेतले आहे.
शनिवारी सकाळी तक्का परिसरात एका प्लास्टिकच्या बास्केटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने खळबळ उडाली होती. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाला ताब्यात घेतले. या बाळासोबत एक भावनिक चिठ्ठीही सापडली होती. “आम्ही गरीब आहोत, बाळाला सांभाळू शकत नाही, कृपया त्याची काळजी घ्या,” अशा आशयाच्या या चिठ्ठीमुळे उपस्थित नागरिकांचे आणि पोलिसांचेही मन हेलावले.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पनवेल शहर पोलीस आणि गुन्हे शाखा कक्ष २ यांनी तातडीने संयुक्त पथके तयार केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, रुग्णालयांमधील नोंदी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पथकाने वेगाने तपास करत संशयितांची ओळख पटवली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी थेट भिवंडी गाठून संबंधित दांपत्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत, या दांपत्याने आपल्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली दिली. बाळाला वाढवण्यास आपण असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कृत्याबद्दल त्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला असून, बाळाला सुरक्षित ठिकाणी सोडल्यास त्याची योग्य काळजी घेतली जाईल, अशी त्यांना आशा होती, असेही त्यांनी सांगितले