गुहागरमध्ये चित्रकार संतोष गुरव यांचा मृतदेह तळ्यात आढळला,आत्महत्या की अपघात यावर प्रश्नचिन्ह…

Spread the love

गुहागर : शहरातील गुरववाडीचे रहिवासी आणि मूर्ती कलाकार तसेच चित्रकार म्हणून परिचित असलेले संतोष परशुराम गुरव (वय ४४) यांचा मृतदेह शुक्रवारी श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या तळ्यामध्ये आढळून आल्याने गुहागर परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी सायंकाळपासून ते नापता होते.

त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, ही आत्महत्या आहे की दुर्दैवी अपघात, याचा तपास सुरू आहे.

गुरुवारी निघून गेले घराबाहेर…

संतोष गुरव हे गुरुवारी सायंकाळी कोणालाही न सांगता घराबाहेर गेले. ते परतले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. सोशल मीडियावर त्यांचा फोटो प्रसारित करण्यात आला. काहींनी मोडका आगर व चिखली भागात त्यांना पाहिल्याचे सांगितले.

मंदिर परिसरात सापडले कपडे आणि सायकल…

शुक्रवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान श्री लक्ष्मीनारायण मंदिरात पूजेसाठी गेलेल्या गुरुजींना मंदिराच्या आवारात संतोष गुरव यांचे अंगावरील कपडे व सायकल आढळून आली. ही बाब पोलिसांना कळविण्यात आली. मात्र, त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता.

दुपारी मृतदेह तरंगताना आढळला…

शोधमोहीम दरम्यान दुपारी सुमारे १२:३० वाजता तळ्याच्या पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसून आला. तो संतोष गुरव यांचाच असल्याचे ओळख पटली.

मूर्तिकार म्हणून परिचित…

संतोष गुरव हे गणेश मूर्ती कलाकार व चित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी गुरववाडी येथे मूर्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. यावर्षी मात्र त्यांनी मूर्ती बनवण्याचा कारखाना बंद ठेवण्याची माहिती ग्राहकांना आधीच दिली होती. त्यांना विस्मरणाचा त्रास होता आणि त्यामुळे कुटुंबीय त्यांची अधिक काळजी घेत होते.

अपघात की आत्महत्या?

संतोष गुरव आंघोळीसाठी तळ्यात उतरले असता घसरून पडले असावेत की मानसिक अस्वस्थतेमुळे आत्महत्या केली असावी, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलिस तपासानंतर याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

घटनास्थळी पोलिसांची उपस्थिती

घटनास्थळी पोलीस निरीक्षक सचिन सावंत, उपनिरीक्षक संदीप भोपळे, असगोली येथील पोलीस पाटील उदय असगोलकर, आरे येथील पोलीस पाटील मिलिंद सुर्वे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page