
मुंबई 8, मे 2023-
महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांपैकी एक असलेले शिर्डी देवस्थान येथे जगभरातून भाविक येत असतात. सबका मालिक एक असा संदेश देणाऱ्या साई बाबांच्या चरणी लीन होण्यासाठी विविध जाती धर्माचे भाविक येत असतात. त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या आणि सुरक्षितता असावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. या धर्तीवर आता साई भक्तांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. साईबाबांच्या शिर्डी नगरीचा आता चेहरा मोहरा बदलणार आहे. खरतरं शिर्डीत लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र शिर्डीत सुविधांची वाणावा आहे. त्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता देशातील विकसित देवस्थानांच्या धर्तीवर असलेल्या शिर्डीच्या विकासासाठी राज्य सरकारने विषेश निधी मंजूर केला असून येत्या दिड वर्षात शिर्डीचा कायापालट होणार असल्याचे वृत्त आहे.
शिर्डीच्या सुशोभीकरणासाठी राज्य सरकारने सुमारे 52 कोटीचा विशेष विकास आराखडा मंजूर केला असून आज (8 मे रोजी) महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत या विकास आराखड्याचे सादरीकरण केले. दरम्यान वाराणसी, पुष्कर, तिरूपती बालाजी तसेच साबरमती येथील दांडी मार्चच्या धर्तीवर शिर्डीत वास्तुशिल्प तसेच साईबाबांच्या जिवनावर आधारित शिल्प देखील उभारले जाणार आहेत. शिर्डी ग्राम परिक्रमा मार्गाचे सुशोभिकरण, मंदिरासमोरील नगर – मनमाड महामार्गाच्या दोन्ही बाजूला हजारो झाडे लावली जाणार आहेत. भक्तांना बसण्याच्या व्यवस्थेसह शिर्डीचे सुशोभीकरण होणार आहे.
राज्य सरकारकडून भाविकांना प्रसन्न वाटावे यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. शहराच्या विविध भागात सुशोभिकरण केले जाणार आहे. त्यासाठी अनेक भाविक दर्शन घेण्याबरोबरच पर्यटनाचाही विचार करतात. त्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असणार आहे. त्यामुळे शिर्डीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी विशेष निधी मंजूर केला गेला आहे. मुख्यत: शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारी, गुंडगिरीला आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याच देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
त्याचबरोबर शिर्डी येथे विमानतळ झाल्यानंतर नाइट लॅंडींग नव्हते, त्यालाही यापूर्वी मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे शिर्डी नगरीच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय होत असल्याने अधिक चांगल्या दर्जाच्या सुविधा, येणाऱ्या भाविकांना प्रसन्न वाटेल अशा बाबींवर भर असणार आहे. याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यासाठी प्रयत्न करत आहे.