गेल्या 12 दिवसांपासून इस्रायल आणि हमासमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू असून मृत्यूचा आकडा वाढतच चालला आहे. गाझा पट्टीत मंगळवारी रात्री झालेल्या बॉम्बहल्ल्यात 500 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे.
इस्त्राईल- या हल्ल्याने अवघे जग सुन्न झाले. रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय साहित्य, औषधांचाही तुटवडा असून इंधन, पाणीही नाही इतकी भयावह स्थिती असल्याचे चित्र आहे. दरम्यान, इस्रायलने अल अहिली रुग्णालयावर हल्ला केल्याचे वृत्त फेटाळले असून त्या ठिकाणी हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचा दावा केला आहे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही याप्रकरणी इस्रायलला क्लीन चिट दिली आहे.
रुग्णालयाजवळ काही पॅलेस्टिनी तरुण रॉकेट्स डागत होते. त्यातील एक रॉकेट भरकटले आणि रुग्णालयावर आदळले असा दावा इस्रायलने केला असून त्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. याच व्हिडीओचा हवाला देत संपूर्ण जगाला कळले पाहिजे की, रुग्णालयावर हमासच्याच दहशतवाद्यांनी हल्ला केला, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक्स अकाऊंटवरून म्हटले आहे.
दिवसाला हजार नवीन रुग्ण
गाझापट्टीतील स्थिती अतिशय भयावह आहे. या ठिकाणी सध्या केवळ तीनच रुग्णालये कार्यान्वित असून दिवसाला हजार नवीन रुग्ण दाखल आहेत, तर रुग्णालयांमध्ये दोन लाख लोकांमागे केवळ अडीच हजार बेड्स असल्याचे चित्र आहे. गंभीर जखमी झालेले अनेक रुग्ण असून ड्रेसिंग, ऍण्टीसेप्टीक, आयव्ही बॅग्स आणि इतर औषधांचाही तुटवडा भासत आहे.
जॉर्डन, सीरिया, सौदी अरेबिया, इराक, इजिप्त या अरब राष्ट्रांनी गाझा पट्टीतील रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
इस्रायली सैन्याने बुधवारी हमासचा आणखी एक प्रमुख मुहम्मद अवदल्लाह आणि नेव्हल कमांडर अकरम हिजाजी या दोघांचा खात्मा केला.
अमेरिका इस्रायलसोबत – बायडेन
गाझातील रुग्णालयावरील हल्ल्यानंतर काही तासांतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन इस्रायल दौऱयावर आले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली.
यानंतर बायडेन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हा हल्ला इस्रायलने केला नसल्याचे सांगताना इस्रायलला क्लीन चिट दिली. दुसऱ्या गटाकडून हा हल्ला झाला असावा, असा दावाही त्यांनी केला. मी इस्रायलला आलो कारण जगाला कळावे की अमेरिका इस्रायलसोबत ठामपणे उभी आहे, असे बायडेन म्हणाले.
हमास ही दहशतवादी संघटना आहे. हमासने अमेरिकेच्याही 33 नागरिकांची हत्या केली आहे. दहशतवाद संपविलाच पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला.
बायडेन यांनी इस्रायलला क्लीन चिट दिल्यानंतर अरब देशांमध्ये तत्काळ पडसाद उमटले. अरब राष्ट्रांची शिखर परिषद रद्द करण्यात आली. इस्रायल दौऱ्यानंतर बायडेन जॉर्डनला शिखर परिषदेसाठी जाणार होते.
इस्रायलमधून 286 हिंदुस्थानी आणि 18 नेपाळी नागरिकांना घेऊन पाचवे विमान मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीत पोहोचले. केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांनी त्यांचे स्वागत केले.
गाझातील रुग्णालयात झालेल्या जीवितहानीचे वृत्त ऐकून धक्का बसला. ही खूप दुःखद घटना आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.