
दिवा:- दिव्यात भाजप मार्फत पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालय व्हावे यासाठी घेण्यात आलेले आंदोलन हे जनतेच्या हिताचे असून या आंदोलनास भाजपच्या ठाण्यातील नेतृत्वाचा पाठिंबाच आहे असे स्पष्ट मत जेष्ठ आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय जनता पार्टी दिवा मंडळातर्फे सोमवारी दिव्यात महापालिकेच्या हक्काचे रुग्णालय आणि महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय व्हावे यासाठी शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. या आंदोलनाला ठाण्यातील भाजप नेतेमंडळी उपस्थित राहिले नाही असा खोटा प्रचार सुरू केला आणि हे आंदोलन फक्त स्टंट होते असे म्हटले. यावरून दिव्यात भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. त्यातच आता भाजप आमदार संजय केळकर यांनी हे आंदोलन कोणत्या पक्ष्याच्या विरोधात नसून हे दिव्यातील जनतेच्या हिताचे आंदोलन होते असे स्पष्ट करत या आंदोलनाला भाजप पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.दिव्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप कायम पुढाकार घेईल असेही त्यांनी म्हटले आहे. दिव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी पक्ष कायम उभा असल्याचे संजय केळकर यांनी बोलताना सांगितले.
गेले कित्येक वर्षे दिवा वासीय हे विकासापासून वंचित आहेत. त्यातच आज दिवा शहराची लोकसंख्या 5 लाखाच्या वर आहे. परंतु तरी सुद्धा दिव्याला ठाणे महानगर पालिकेचे हॉस्पिटल नाही हे दुर्दैव आहे. आज दिव्यात हॉस्पिटल साठी भूखंड राखीव आहे. तसेच 31 कोटी रुपये निधीही मंजूर असताना सध्या दिव्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे अशी खंत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली आहे. हॉस्पिटलच्या प्रश्नाकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिले पाहिजे असे केळकर म्हणाले.