
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथे साडेचार वर्षांपूर्वी वाहतुकीचे चलन न दिल्याच्या वादातून तलवारीने वार करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने शुक्रवारी १० वर्षे सक्तमजुरी आणि ७ हजार रुपये
दंडाची शिक्षा सुनावली.
योगेश अनंत सावंत (रा. सैतवडे, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात संदेश सुरेश पवार (३०, रा.वाटद-खंडाळा, रत्नागिरी) याने जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, फिर्यादी संदेश हा वाटद-खंडाळा येथील साहस ट्रान्स्पोर्ट कंपनी येथे सुपरवायझर म्हणून कामाला होता. तर योगेश हा त्याठिकाणी चालक म्हणून कामाला होता. ८ नोव्हेंबर २०२० रोजी योगेशने माल वाहतुकीचे चलन ट्रान्स्पोर्ट कंपनीत जमा केले नव्हते. त्यामुळे संदेशने योगेशला फोन करुन चलन जमा करण्यास सांगितले. त्यावरुन त्यांच्यात फोनवरच बाचाबाची होत योगेशने मी थोड्या वेळात कंपनीत येतो व चलन जमा करतो, असे सांगितले होते. यानुसार त्याच रात्री कंपनीबाहेर संदेश पवार आणि त्याच्यासोबत कंपनीतीलच संकेत गुरव व अंबादास शिरसाट हे तिघे योगेशची वाट पाहत थांबले होते. काही वेळाने योगेश दुचाकीवरुन तिथे आला व चलनाच्या कारणावरुन पुन्हा संदेश सोबत त्याची बाचाबाची झाली. त्यांच्यातील वाद तेथेच असलेल्या संकेत आणि अंबादास यांनी सोडवला व त्यानंतर योगेश दुचाकीवरुन निघून गेला होता. परंतु त्यानंतर काही वेळाने तो पुन्हा दुचाकीवरुन तिथे आला आणि त्याने शर्टाच्या आतमध्ये लपवून ठेवलेली तलवार बाहेर काडून संदेशवर उगारली. संदेश मागे हटल्यामुळे तलवारीचा वार त्याच्या कपाळावर होत तो रक्तबंबाळ झाला. त्यानंतर योगेशने पुन्हा तलवार उगारली असता बाजुलाच असलेल्या अंबादासने त्याला पकडले. तेव्हा योगशने त्याच्यावरही तलवार उगारली असता त्याने तो वार चुकवला. या प्रकारानंतर सर्वांनी तिथून पळ काढला होता.
या घटनेत जखमी झालेल्या संदेशने स्वतःवर उपचार करुन घेतल्यानंतर जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन आरोपी योगेश सावंत याच्यावर भा.दं.वि. कायदा कलम ३०७ अन्वये तसेच हत्यार ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रायसिंग पाटील यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲड. अनिरुध्द फणसेकर यांनी १० साक्षीदार तपासत केलेला युक्तिवाद प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.एस. गोसावी यांनी ग्राह्य मानला. त्यांनी आरोपीला भा.दं.वि. कलम ३०७ नुसार १० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड तसेच हत्यार ॲक्टमध्ये ३ वर्ष शिक्षा आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.