योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यामाध्यमातून स्वतःला आणि राज्याला समृद्ध करणे हे मच्छिमार बांधवांचे दायित्त्व… यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यासाठी मी कटिबद्ध – राजश्री विश्वासराव यांचे प्रतिपादन.
जनशक्रातीचा दबाव न्यूज | राजापूर | फेब्रुवारी ११, २०२३.
▪️मागच्याच आठवड्यात केंद्र सरकारने बहुआयामी अर्थसंकल्प सादर केला. यावर ‘आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन तयार केलेला अर्थसंकल्प’ अशी राळ उडवण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. आणि यातूनच सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन अर्थसंकल्प सादर केल्याचे प्रमाणपत्र विरोधकांनी दिले. मत्स्यसंपदा योजनेसाठी ६ हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांना उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी सरकारने केला आहे.
▪️यालाच जोड म्हणून त्यापाठोपाठ लागलीच महाराष्ट्र सरकारचे मत्स्य व्यवसाय मंत्री. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी “सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमारांना व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या बळ देण्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करेल; यासाठी लहान मच्छिमारांना व रापणकारांना अत्यंत सुलभ पद्धतीने अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.” असे जाहीर केले.
▪️या निर्णयाद्वारे आता तयार जाळी खरेदी व बिगर यांत्रिकी नौका बांधणीच्या अनुदानात लक्षणीय वाढ होणार असून, राज्यातील सागरी क्षेत्रामध्ये परंपरागत पद्धतीने मासेमारी करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लहान मच्छिमारांना व रापणकारांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयासाठी मी मा. सुधीरभाऊ व महाराष्ट्र सरकारला धन्यवाद देते आणि अभिनंदनही करते.
▪️महाराष्ट्रात आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या स्वरुपात मच्छिमार बांधवांचा विचार करण्यात आला नव्हता. जवळपास १३ वर्षांनंतर प्रथमच मासेमारी करणाऱ्या बांधवांना आर्थिक दिलासा देण्याचे काम मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संवेदनशील नेतृत्त्वाने केले आहे. आता, सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील मासेमारी करणाऱ्या नौकांवर वापरण्यात येणाऱ्या नॉयलॉन व मोनोफिलॅमेंट जाळी खरेदीवर ५० टक्केपर्यंत व रापण संघाच्या प्रत्येक सभासदाला रापणीच्या तयार जाळ्यांवर तयार जाळ्याच्या किंमतीच्या ५० टक्केपर्यंत अनुदान देण्यात येईल.
▪️यावर बोलताना भाजपा उद्योग आघाडी महिला समिती सहप्रमुख श्रीम. राजश्री विश्वासराव म्हणाल्या, “मी कोकणातील सर्व मच्छिमार बांधवांना आवाहन करते की, शासनाने आपल्यासमोर एक उत्तम योजना ठेऊन समृद्ध होण्याचा राजमार्ग उपलब्ध करून दिला आहे. आपल्या समृद्धीतच राज्याची समृद्धी अंतर्भूत आहे. तरी या योजनेचा शक्य तेवढ्या अधिक प्रमाणात लाभ घ्यावा. याबाबतीत काही अडचणी असल्यास त्या दूर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आपण स्थानिक पातळीवर सरपंच वा अन्य लोकप्रतिनिधी किंवा भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपली समस्या माझ्यापर्यंत पोहचवा. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आपल्या समस्या दूर करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”