
जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | एप्रिल १७, २०२३.
वार्ताहर : श्री. सुरेश सप्रे.
गेले अनेक महिने ताम्हाणे-कोसुंब रस्त्याची दुरवस्था झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर या पंचक्रोशीतील सरपंच व नागरीकांनी रास्ता रोको आंदोलनाचा निर्वाणीचा इशारा प्रशासनाला दिला होता. यामुळेच सा.बां. विभागाला खडबडून जाग आली. या मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करणाऱ्या मे. सुनंदा कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीला रखडलेली वर्क ऑर्डर तातडीने दिल्याने आंदोलन रद्द केले होते. ठेकेदाराने सदरचे काम दि. १७ एप्रिल रोजी सुरू करणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे आज दि. १७ रोजी प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाल्याने पंचक्रोशीतील नागरीकांच्या मागणीला यश आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सार्वजनिक बांधकाम विभागाने प्र.जि.मा. ४८ असणाऱ्या पोचरी-परचुरी-कोसुंब-कुळेफणसवळे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम आम. शेखर निकम यांच्या प्रयत्नाने विशेष दुरुस्ती कार्यक्रम २०२२ अंतर्गत मंजूर करण्यात आले होते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे या कामाची वर्क ऑर्डर काढण्यात सा. बां. विभाग चालढकल करत असल्याने कामाची सुरुवातच झाली नव्हती. दिवसेंदिवस या मार्गावरील कोसुंब-ताम्हाणे या रस्त्याची झालेली दुरवस्था जीवघेणी ठरण्याची भीती व्यक्त होत होती. याच पार्श्वभूमीवर ताम्हाणे पंचक्रोशीतील सरपंच व नागरीकांनी सा.बां. विभागाला निवेदन देवून ‘रास्ता रोको’ करण्याचा इशारा दिला होता. या निवेदनाची दखल घेऊन संबंधित विभागाने ठेकेदार कंपनीला त्वरीत काम सुरु करण्याची वर्क ऑर्डर देत काम सुरू करा, अशी सूचना दिली.
या रस्त्याची दुरवस्था पाहून या संदर्भातील बातम्या वेळोवेळी प्रसिद्ध करुन रस्ता दुरुस्तीची आग्रही मागणी लावून धरण्यात आली होती. नागरीकांचा पाठपुरावा आणि प्रिंट व सोशल मिडीया यांच्या बातम्या याचा परिणाम म्हणून अखेर सा.बां. विभागाने प्रलंबित असलेली वर्क ऑर्डर काढली आहे आणि सुनंदा कन्स्ट्रक्शन कंपनीनेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आज दि. १७ एप्रिल रोजी कामाला सुरूवात केली आहे.