
जनशक्तीचा दबाव न्यूज | गुहागर | मे ०७, २०२३.
तालुक्यातील सालकाची वाडी येथील तरुण रूग्ण तेजस शांताराम पाष्टे मागील २ ते ३ वर्षे पोटाच्या दुर्धर विकाराने त्रस्त होता. त्याच्या आप्तेष्टांनी अनेक डॉक्टरांकडे जाऊन वेगवेगळ्या उपचारपद्धती आजमावून पाहिल्या. अगदी सर्व प्रयत्न निष्फळ ठरले त्यावेळी संतोष जैतापकर संचलित वैद्यकीय टीमशी संपर्क साधून मदतीबाबत विचारणा केली. श्री. जैतापकर यांच्या वैद्यकीय टीमचे प्रमुख श्री. काशीराम पाष्टे यंनी लगेच जबाबदारी स्वीकारली.
तेजसच्या या शस्त्रक्रियेसाठी नामांकित रुग्णालयात जवळपास ८ ते १० लाख रूपयांचा खरच येईल असे सांगितले गेले. परंतू एवढा खरच करण्यासाठी तेजसचा परिवार आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हता. अशावेळी त्याच्या काकांनी स्थानिक जि.प. सदस्य तसेच अन्य लोकप्रतिनिधींना फोन करून मदतीचे आवाहन केले. यावेळी मदतीचे आश्वासन जरूर मिळाले मात्र मदत पोचली नाही. शेवटी श्री. काशीराम पाष्टे यांच्या सल्ल्याने ३१ डिसेंबर २०२२ रोजी तेजसला मुंबई येथील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
‘कोलेक्टोमी क्लोजर’ची शस्त्रक्रिया जनरल विभागाचे मुख्य डॉक्टर अन्सारी व डॉ. आकांक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या सर्व घडामोडींमध्ये मायभूमी फौंडेशनचे अध्यक्ष श्री. काप साहेब, संतोष जाधव, रघुनाथ पोस्तुरे, देवेंद्र गोठल, मितेश घडशी, महेंद्र डाफळे आणि वैद्यकीय टीमने महत्त्वाची भूमिका पार पाडली. जवळपास ७० दिवसांनंतर तेजस जे जे रुग्णालयातून ठणठणीत होऊन परतला. तातडीची मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. काशीराम पाष्टे व मितेश घडशी यांचेही लाकांनी कौतुक केले.
गुहागर तालुक्याला खऱ्या अर्थाने अपेक्षित नेतृत्त्व लाभले असून गोरगरीब जनता आनंदी आहे. गरिबांच्या अडचणी दूर करण्यासाठी संतोष जैतापकर यांच्या रूपाने गुहागर तालुक्याला एक आशेचा किरण लाभला आहे. अशा बोलक्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.