ठाणे : राज्यातील विविध भागातून ठाणे पोलिस दलात बदल्या झालेल्या २१ पोलिस अधिकाऱ्यांची विविध पोलिस ठाण्यात नेमणुका करण्यात आल्या आहेत. यामध्ये एक साहाय्यक पोलीस आयुक्त, सहा पोलीस निरीक्षक, पाच साहाय्यक पोलीस निरीक्षक, नऊ उपनिरीक्षकांचा सामावेश आहे. यासंबंधीचे आदेश ठाणे सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी काढले आहेत.
मुंबई, Nagpur Navi Mumbai यासह विविध पोलीस दलातून काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या Thane पोलीस दलात नुकत्याच झाल्या होत्या. हे अधिकारी ठाणे पोलिस दलात हजर झाले होते. पण, त्यांना कुठेही नेमणूका देण्यात आल्या नव्हत्या. या पोलीस अधिकाऱ्यांच्या आता नेमणूका करण्यात आल्या आहेत. तर काही पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई पोलीस दलातून ठाण्यात बदली झालेले साहाय्यक पोलीस आयुक्त शेखर डोंबे यांची मानवी संसाधन विभागात बदली करण्यात आली आहे.
तर मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक संजय दणवे यांची मुंब्रा पोलीस ठाणे, सुनील वरूडे यांची शिळडायघर पोलीस ठाणे, मंदार लाड यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा, विजयकुमार कदम यांची भिवंडी शहर पोलीस ठाणे, नागपूर पोलीस दलातील आशालता खापरे यांची खडकपाडा पोलीस ठाणे, राबोडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांची अंतर्गत बदली करून त्यांची बदली शिळ-डायघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत.
मुंबई पोलीस दलातील साहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सामंत यांची भोईवाडा पोलीस ठाणे, नितिन दिनकर यांची निजामपूरा पोलीस ठाणे, पोपट झोले यांची भिवंडी शहर पोलीस ठाणे, वाशिम गुन्हे अन्वेषण शाखेचे हेमंत ढोले यांची कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे नेमणूक झाली आहे. तर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे विजय मोरे यांची नारपोली पोलीस ठाण्यात अंतर्गत बदली झाली आहे. तसेच नवी मुंबई पोलीस दलातील उपनिरीक्षक अनिल शिनकर आणि संजय देशमुख यांची विष्णुनगर पोलीस ठाणे, ठाणे ग्रामीण पोलीस दलातील स्वाती जगताप यांची महात्मा फुले पोलीस ठाणे, मुंबई पोलीस दलातील भारत मारकड यांची ठाणेनगर, नवी मुंबई पोलीस दलातील योगेश परदेशी यांची राबोडी पोलीस ठाणे, तुषार माने यांची शिवाजीनगर पोलीस ठाणे, निलम कौलव आणि स्नेहल शिंदे यांची नियंत्रण कक्षात, मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस दलातील दिगंबर पाटील यांचीही नियंत्रण कक्षात नेमणूक झाली आहे.