
मुंबई- मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता अवघे 15 दिवस शिल्लक असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. दादर येथील शिवसेना भवनात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे महानगरपालिका उमेदवारांसमोर एक महत्त्वाचे प्रेझेंटेशन सादर केले, ज्यामध्ये सत्ता आल्यास मुंबईच्या विकासासाठी नेमके काय करायचे, याबाबतचा सविस्तर आराखडा मांडण्यात आला. हे प्रेझेंटेशन आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केले जाणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक सुधारणा करून लवकरच मुंबईकरांसाठीचा अधिकृत ‘वचननामा’ जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महापलिकेच्या मालकीची जमीन खासगी विकासकांच्या घशात न घालता तिथे मुंबईकरांची सोय करणाऱ्या शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलिस कर्मचाऱ्यांना तसेच गिरणी कामगारांना हक्काची घरे देणार. तसेच मुंबई महापालिकेचे स्वतःचे गृहनिर्माण प्राधिकरण असेल. इतकेच नव्हे तर पुढील 5 वर्षात 1 लाख मुंबईकरांना परवडणारी घरे दिली जातील, अशी आश्वासने आदित्य ठाकरे तसेच अमित ठाकरे यांनी दिली आहेत. शिवसेना आणि मनसे यांच्या वचननाम्यात मुंबईकरांसाठी काय आहे, हे सविस्तर पाहूया.
बेस्ट बस भाडे…
तिकीट दरवाढ कमी करून रुपये 5,10,15,20 फ्लॅट रेट ठेवण्यात येणार. तसेच बेस्टच्या ताफ्यात 10 हजार इलेक्ट्रिक बसेस, 900 डबल-डेकर इलेक्ट्रिक बसेस असतील. विद्यार्थी आणि महिलांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास सुविधा सुरू करण्यात येतील.
सार्वजनिक आरोग्य…
मुंबईकरांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. मुंबईत पांच नवीन वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये रुग्णांना जेनेरीक औषधी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 24×7 हेल्थ केअर कंट्रोल रूम आणि हेल्थ टु होम सेवा, महापालिकेची स्वतःची रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात येणार. तसेच मुंबई महापालिकेचे स्वतःचे कॅन्सर रुग्णालय असेल, असे वचन अमित ठाकरे यांनी दिले.
शिक्षण.
पालिकेच्या शाळांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात जाऊ न देण्याचा ठाम निर्धार व्यक्त करत, शैक्षणिक गळती रोखण्यासाठी महापालिका शाळांमध्येच आता बारावीपर्यंतचे ज्युनिअर कॉलेज सुरू करण्यात येणार. यासोबतच, मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी सर्व माध्यमांच्या शाळांत ‘बोलतो मराठी’ हा विशेष उपक्रम राबवून पालिकेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर भर दिला जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये..
घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करणार आणि नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला रू.1,500 स्वाभिमान निधी. कोळी मच्छीमार महिला विक्रेत्यांची नोंदणी, अर्थसाह्य आणि नवीन परवान्यांची तरतूद ज्यात समुदायांतर्गत परवान्यांच्या हस्तांतरणाची सोय केली जाईल. कष्टकरी मुंबईकरांसाठी फक्त 10 रुपयांत नाश्ता आणि दुपारचे जेवण देणारी मासाहेब किचन्स. मुंबईतील आमच्या भगिनींच्या लहान मुलांसाठी उत्कृष्ट दर्जाची पाळणाघरे उभी करू. मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर दर 2 किलोमीटरला एक अशी महिलांसाठी उत्तम स्वच्छता असलेली शौचालये बांधली जातील.
प्रत्येकाला सुरक्षित पार्किंग..
महापालिकेच्या वाहनतळांमध्ये पार्किंग मोफत असे तसेच नव्या पुनर्विकसित इमारतींमध्ये प्रत्येक फ्लॅटला पार्किंग देण्याचे आश्वासन यावेळी ठाकरे बंधूंनी दिले.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयं रोजगार अर्थसहाय्य योजना..
एक लाख तरुण-तरूणींना प्रत्येकी 25 हजार ते 1 लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहाय्यता निधी, तसेच 25 हजार गिग वर्कर्सना आणि डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येणार.
फूटपाथ आणि मोकळ्या जागा..
रस्त्यांइतकेच फूटपाथही महत्वाचे आहेत, ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ धोरणाची अंमलबजावणी करून फुटपाथ पेव्हर ब्लॉक-फ्री आणि दिव्यांग-स्नेही करणार. शब्दांचा खेळ करून मुंबईतील मोकळ्या जागा आणि विशेषतः महालक्ष्मी रेसकोर्स, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे जंगल आणि अन्य मोकळ्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत बिल्डरांना आंदण दिल्या जाणार नाहीत.
मुंबईकरांना मोकळा श्वास..
गेल्या तीन वर्षांत वाढलेले प्रदूषण तातडीने कमी करण्यासाठी मुंबई पर्यावरण कृती आराखड्याची कठोर अंमलबजावणी करणार. हवा गुणवत्ता निर्देशांक नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई बांधकाम पर्यावरणीय व्यवस्थापन योजना अंमलात आणणार. अनियंत्रित विकासामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे जंगल तसेच मुंबईतील कांदळवने आणि वृक्षसंपदा उद्ध्वस्त होऊ देणार नाही.
100 युनिटपर्यंत वीज मोफत…
घरगुती वीज वापर करणाऱ्या ‘बेस्ट विद्युत’च्या ग्राहकांना 100 युनिटपर्यंत वीज मोफत देणार. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये बेस्ट विद्युतच्या विस्तारीकरणासाठी विशेष योजना आखणार.
प्रत्येकाला पाणीहक्क..
डिसॅलिनेशन प्रकल्प उभारणार. एसटीपी प्रकल्प वेळेत पूर्ण करणार, नवीन इमारतींमध्ये रेनवॉटर परकोलेशन पिट्स आणि मुंबईत काही ठराविक जागी रेन वॉटर होल्डिंग टॅंक्स साकरणार. सध्याच्या अत्यल्प दरातच मुंबईकरांना, मग तो टॉवरमध्ये राहणारा असो की वस्ती-पाड्यात, प्रत्येकाला स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार.
देशातील सर्वात मोठे ग्रंथालय
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने या देशातील सर्वात मोठे ग्रंथालय उभारले जाईल. पाळीव पशुंसाठी पेट पार्क, पेट क्लिनिक, पेट अॅम्ब्युलन्स आणि पेट क्रेमॅटोरियम उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी दिले आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर