मुंबई : मराठवाड्यातील ठाकरेंचा बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणुका आहेत, धक्क्यावर धक्के बसणार असा मोठा दावा मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. 4 जूनला मोठा धक्का बसणार, या रावसाहेब दानवे यांच्या दाव्याने भुवया उंचावल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
धक्क्यावर धक्के बसणार, रावसाहेब दानवेंचा दावा…
मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं की, मला जालन्यातून उमेदवारी जाहीर केली आहे. मराठवाड्यातील काही जागा जाहीर झाल्या आहेत, तर काही जागांबाबत चर्चा सुरु आहेत. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मी आलो होतो. मराठवाड्यातील कोणता नेता जाणार या प्रश्नावर उत्तर देताना दानवे म्हणाले की, आमच्या विचाराचा नेता असेल तर त्याला आमच्या पक्षात आणण्याचे काम आम्ही करत असतो.
अंबादास दानवेंबाबत सूचक वक्तव्य…
दरम्यान, अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना रावसाहेब दानवे यांनी म्हटलं की, अंबादास दानवे पूर्वश्रमीचे भाजपचे नेते आहेत. ते आज आमच्यात नाही ते त्यांच्या पक्षाचं काम करतात. आमचा त्यांच्याशी थेट संपर्क झालेला नाही. मात्र, संभाजीनगर जागा आम्हाला मिळावी किंवा मित्र पक्षाला जरी मिळाली तर ती जिंकण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहेत असं सूचव वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
4 जूनला मोठा धक्का बसेल…
रावसाहेब दानवे यांनी दावा केला आहे की, धक्क्यावर धक्के, धक्क्यावर धक्के नक्कीच बसतील. 4 जूनला मोठा धक्का बसेल. निवडणूक आहे, साऱ्या गोष्टी निवडणुकीत कराव्या लागतात, याचा अर्थ हा नाही की आम्ही आत्मविश्वास गमावला. जर कोणाला घेऊन आत्मविश्वास गमावला असं म्हणत असतील तर ते चुकीचं आहे.
आमची संभाजीनगरची सीट वन वेच…
महाविकास आघाडी समविचारी नाही. तीन पक्षाचे तीन तोंड आहेत. जिंकल्यावर देखील एक राहणार नाही, यांचा वाद जुना आहे. आजही आमची संभाजीनगरची सीट वन वेच आहे आणि कोणी मदतीला धावून येणार असेल तर, त्याला आम्ही तयार आहोत, असं सूचक वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. आमच्यात जागांचा वाद राहिलेला नाही, असंही दानवेंनी स्पष्ट केलं आहे.