
मुंबई- वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हिंदीच्या सक्तीला विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरे स्वतःच्या गलिच्छ राजकारणासाठी हिंदीला विरोध करून भाषिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे हे कृत्य गुन्हेगारी संहितेत बसणारे आहे. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
गुणरत्न सदावर्ते तक्रार दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राज ठाकरे मनसेत कोणत्या पदावर आहेत हे मला माहिती नाही. पण मी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरे यांनी नव्या शैक्षणिक धोरणाला विरोध केला आहे. राज्य सरकारने गत 16 तारखेला राज्यात हे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांच्या मुलांना एक अधिकची भाषा शिकण्याची संधी उपलब्ध झाली. पण राज ठाकरे यांनी स्वतःच्या गलिच्छ राजकारणासाठी व स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी भाषिक वाद निर्माण करण्याचा घाट घातला. त्यांनी आपल्या ट्विटद्वारे शाळा व ग्रंथालये टार्गेट करण्याचे संकेत दिले. ही अत्यंत विदारक गोष्ट आहे.
राज ठाकरेंचे वर्तन तालिबानी…
स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणताही राजकारणी एवढ्या तालिबानी पद्धतीने वागला नाही. राज ठाकरे यांचे हे वर्तन अत्यंत दुःखद आहे. त्यांना कायदा कळतो की नाही हा प्रश्न उपस्थित करणारे आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाची होळी केली. ही कृती अत्यंत चुकीची, बेकायदा, घटनाबाह्य तथा कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणारी आहे. विशेषतः ही कृती बॉम्बे पोलिस अॅक्ट मॅन्युअल व गुन्हेगारी संहितेत बसणारी आहे, असे सदावर्ते म्हणाले.
तेव्हा तुमचा पुरुषार्थ कुठे जातो?
ते पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टाने एका आदेशाद्वारे सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स लावण्यास मनाई केली. पण राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी असे फ्लेक्स लावून कायद्याचे उल्लंघन केले. भाषेवर आधारित लोकांना वर्गीकृत करणे, भाषेतील लोकांमध्ये वाद निर्माण करणे, एवढेच नाही तर हे एकप्रकारे जातीय तेढ निर्माण करणारेही कृत्य आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल झाला पाहिजे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदीला विरोध करण्यापेक्षा आजूबाजूची दारूची दुकाने बंद करण्याचे निवेदन द्यावे. तेव्हा तुमचा पुरुषार्थ कुठे जातो?
राज ठाकरे यांना कायदा समजत असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांना प्रतिबंध झाला पाहिजे. यासाठी आम्ही पोलिसांना नव्या शैक्षणिक धोरणाची प्रत दिली आहे. त्यांनी त्याचा अभ्यास करून या प्रकरणी कारवाई करावी.
राज ठाकरे स्वतःच्या कार्यकर्त्यांना वेठीस धरतात…
राज ठाकरे यांना आतापर्यंत आपला कोणताही मुद्दा इच्छित ठिकाणी नेता आला नाही. हे लोक सर्वसामान्य लोकांना आपली मुले मराठी शाळेत शिकवण्यास सांगतात. त्यानुसार त्यांनी आपल्या पक्षाच्या 5 प्रमुख नेत्यांची मुलेही मराठी शाळेत शिकतात हे जाहीरपणे सांगावे. तुम्हाला स्वतःच्या मुले शिकवण्यासाठी पेडर रोडवरील शाळा लागतात. आणि आमच्या मुलांना व्हर्नाक्युलर शाळांमध्ये शिकण्याचा सल्ला देता. तुम्हाला आम्ही एक अधिकची भाषा शिकावी असे वाटत नाही. ही तुमच्या पोटातील जळजळ आहे. त्यांनी हा जीआर जाळण्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या मुलांना पाठवले. त्यांची स्वतःची मुले काय करत होती? बेडरूममध्ये क्रिकेटची मॅच पाहत होती का? म्हणजे गुन्हे दाखल व्हायचे असतील तर ते सामान्य कार्यकर्त्यांवर व्हावेत असे त्यांचे धोरण आहे. याद्वारे ते स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही वेठीस धरत आहेत, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.