
*चिपळूण*: गुहागर विधानसभा मतदारसंघातील ७२ गावे वगळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिपळूण तालुकाप्रमुख पदी तळसर-मुंढे येथील बळीराम गुजर यांची निवड झाली आहे. ही निवड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना ठाकरे नेते व सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी जाहीर केली. या निवडीबद्दल गुजर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महिनाभरापूर्वी तालुकाप्रमुख राहिलेले विनोद झगडे यांनी तालुकाप्रमुख पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याची चर्चा सुरू होती. त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याची शिवसेना ठाकरेच्या वरिष्ठस्तरावर दखल घेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले तळसर मुंढे येथील बळीराम गुजर यांची शिवसेना ठाकरे चिपळूण तालुकाप्रमुखपदी नियुक्त्ती केली आहे.
तसे पत्र गुजर यांना देण्यात आले असून शिवसेना ठाकरे पक्षाला चिपळूणमध्ये तालुकाप्रमुख म्हणून नवा चेहरा लाभला आहे. याबाबत ते गुजर म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत गेली काही वर्षे एकनिष्ठ राहिलो आहे. या एकनिष्ठतेचे फळ म्हणून मला न्याय दिला आहे. या पदाच्या माध्यमातून चिपळूणमध्ये शिवसेना पक्ष वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिकांना सोबत घेऊन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू असे श्री. गुजर म्हणाले.