जनशक्तीचा दबाव न्यूज | गणपतीपुळे | मे ०६, २०२३.
शाळा संपल्या आणि उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या असून, पर्यटकांची पावले हळूहळू कोकणातील निसर्गरम्य पर्यटनस्थळांकडे वळू लागली आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गणपतीपुळेत दररोज दहा ते बारा हजार पर्यटक येऊन जात आहेत. शुक्रवारी (ता. ५) बुद्ध पौर्णिमेला सुट्टी असल्यामुळे पर्यटकांच्या गर्दीत वाढ झाली आहे. १० मे नंतर पर्यटकांच्या संख्येत अधिक वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उन्हाचा कडाका जाणवत असल्यामुळे पर्यटकांची पावले किनारी भागांसह थंड हवेच्या ठिकाणांकडे वळत आहेत. सर्वाधिक पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, गुहागर आणि रत्नागिरीतील गणपतीपुळे किनाऱ्यावर येत असतात. शासकीय कार्यालयांमध्ये पाच दिवसांचा आठवडा ही संकल्पना राबवण्यात येत असल्यामुळे शनिवारी, रविवारी मुंबई, पुण्याचे पर्यटक फिरण्यासाठी रत्नागिरीत दाखल होतात. उन्हाळी हंगामातही पश्चिम महाराष्ट्रासह अन्य जिल्ह्यातील लोक किनाऱ्यांच्या ठिकाणी येत आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेणाऱ्यांमध्ये दररोज दहा ते बारा हजार पर्यटकांची नोंद झाली आहे. हा आकडा पुढील काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे. येथील पर्यटन व्यावसायिकांनाही हंगामाची प्रतीक्षा आहे. किनाऱ्यावर पॅराग्लायडिंग, नौकांमधून समुद्रसफर, किनाऱ्यावर उंट व गाडीसवारीचा आनंद घेता येतो. पर्यटकांची रेलचेल सुरू झाल्यामुळे किनाऱ्यांवरील व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.