टी-20 विश्वचषक विजयानंतर टीम इंडियाने नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर भारतीय संघ मुंबईला पोहोचला आहे. टीम इंडियाचा रोड शो होत आहे. या पार्श्वभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातील क्रिकेट प्रेमी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे प्रचंड गर्दी केली आहे. या रोडशो नंतर टीम इंडियाला १२५ कोटी रुपयांचा चेक वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमात देण्यात आला.
मुंबई : टीम इंडियाची आज संध्याकाळी मुंबईत विजयी परेड होत आहे. बीसीसीआयने या विशेष रोड शोचे आयोजन केले आहे. या रोड शोसाठी मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे. आपल्या देशात क्रिकेट प्रेमींची संख्या कमी नाही. त्यात आज भारतीय संघाची विजयी रॅली निघणार असल्यानं, देशाच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेट प्रेमी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात प्रचंड गर्दी केली आहे. दरम्यान या रोड शोची समाप्ती वानखेडे स्टेडियमवर झाली. तिथे झालेल्या कार्यक्रमात टीम इंडियाला सव्वाशे कोटी रुपयांचं भरघोस बक्षिस देण्यात आलं. त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.
विजयी टीम इंडियाच्या स्वागतासाठी क्रिकेट प्रेमींनी केलेली गर्दी..
महापालिकेकडून विशेष काळजी :
जेव्हा मरीन ड्राईव्ह परिसरातील व्यवस्थेच्या आढावा घेतला त्यावेळी नाशिक, नगर, गुजरात अशा देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून क्रिकेटचे चाहते भारतीय क्रिकेट संघाची एक झलक पाहण्यासाठी आल्याचं दिसून आलं. रोड शो वेळी उत्साही क्रिकेट प्रेमी रस्त्यावर उतरू नयेत यासाठी देखील महानगरपालिकेने विशेष काळजी घेतल्याचं दिसून आलं. मरीन ड्राईव्ह येथे फुटपाथ आणि मुख्य रस्ता यामध्ये बांबूच्या साह्याने बॅरिकेटिंग करण्यात आली आहे.
ओपन बसमधून होणार रोड शो :
वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघाचे सर्व खेळाडू ओपन बसमधून रोड शोमध्ये सहभागी होतील. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम असा हा रोड शो असणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर सर्व खेळाडूंचा सत्कार समारंभ होईल. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ही विजयी रॅली निघणार आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस पुरेपूर काळजी घेत आहेत.
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल :
विश्वविजेती टीम इंडिया ही चमचमती ट्रॉफी घेऊन आज मायदेशी परतली. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर टीम इंडियाचं आगमन झालं. यावेळी क्रिकेटप्रेमींनी जल्लोषात खेळाडूंचं स्वागत केलं. त्यानंतर मुंबईत टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक निघाली आहे. भारतीय क्रिकेटपटूंचं स्वागत करण्यासाठी मुंबई सज्ज आहे. विमानतळावरुन एका उघड्या बसमधून टीम इंडियाचे खेळाडू वानखेडे स्टेडियमवर जातील. त्यांच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज आहेत. त्यामुळे मुंबईतील अनेक मार्ग बंद असतील. टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. तसंच मिरवणुकीदरम्यान लोकलचा वापर करण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय.