मुंबई- मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसर्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला आहे. या सामन्यात २५ रन्सने न्यूझीलंडने दणदणीत विजय मिळवला आहे. ३ सामन्यांच्या या टेस्ट सिरीजमध्ये न्यूझीलंडने भारताला आपल्याच देशात व्हाईट वॉश दिला आहे. भारतात ३ सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये सर्व सामने गमावण्याची ही टीमची पहिलीच वेळ आहे.
टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई टेस्टमध्ये पराभव झाला आहे. 24 वर्षात पहिल्यांदाच पाहुण्या टीमने भारताला त्याच्याच भूमीवर टेस्ट सिरीजमध्ये व्हाईट वॉश दिला आहे. यापूर्वी 2000 मध्ये खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 2-0 असा पराभव केला होता. न्यूझीलंडचा दुसरा डाव १७४ रन्सवर आटोपला होता. भारताकडून डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने पाच विकेट्स घेतले. या सामन्यात किवी टीमने पहिल्या डावात 235 रन्स केले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या डावात 263 रन्स केले. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारे भारताला 28 रन्सची आघाडी मिळाली होती.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियासमोर विजयासाठी 147 धावांचं लक्ष्य होतं. छोट्या धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया अनेकवेळा फसली आहे. टीमने कर्णधार रोहित शर्माची पहिली विकेट 13 रन्सवर गमावली, त्यानंतर विकेट पडण्याची प्रक्रिया सुरुच राहिली. भारताने अवघ्या 29 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. भारतासाठी सर्वात मोठी खेळी ऋषभ पंतने खेळली आणि 9 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 64 रन्स केले. या काळात टीमच्या एकूण आठ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. अखेरीस हतबल झालेल्या टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं.