मुंबई- भारतीय क्रिकेट नियामक मंडल (BCCI) यांनी सोमवारी आगामी आशिया चषक २०२३ (Asia Cup 2023) स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघ जारी केला आहे. जलदगती गोलंदाज जसप्रीत बूमराह, मधल्या फळीतील फलंदाज के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी संघात पुनरागमन केले असून नवख्या तिलक वर्मा यालादेखील संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे याची माहिती देण्यात आली.
https://twitter.com/BCCI/status/1693541459545514427?t=0Vbt34meZkPPuRuQM_5O1Q&s=19
३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंका संयुक्तपणे करणार आहेत. भारत आपल्या आशिया चषक मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने करेल. ही लढत २ सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी येथे होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार असून अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
एक वर्षाहून अधिक कालावधीनंतर स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचे वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन होत आहे. सध्या आयर्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टि-२० मालिकेत संघात पुनरागमन केल्यानंतर, बुमराह आशिया चषक स्पर्धेस खेळण्यास सज्ज आहे. घोट्याच्या दुखापतीमुळे काही काळ संघात नसलेल्या मोहम्मद सिराज याचेही संघात पुनरागमन होणार असून त्याच्या पुनरागमनामुळे भारताच्या वेगवान गोलंदाजीला बळकटी मिळणार आहे. नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यात दमदार कामगिरी केल्यामुळे धुवाधार फलंदाज तिलक वर्मा याला आशिया कप संघात स्थान मिळाले आहे.
स्टार फलंदाज के एल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांनीही दुखपतीनंतर तंदरुस्त होऊन संघात स्थान मिळवले आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून पांड्याशिवाय रवींद्र जडेजा याचा संघात समावेश केला असून फिरकी गोलंदाजीची धुरा कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्या खांद्यावर असणार आहे. फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चंहल याला मात्र संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे.
या स्पर्धेची सुरुवात पाकिस्तान आणि नेपाळ दरम्यान मुल्तान येथे होणार आहे. स्पर्धेतील अ गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ आहेत तर बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश ब गटामध्ये आहे. या स्पर्धेत पाकिस्तान दोन ठिकाणी चार सामने आयोजित करेल आणि उर्वरित सामन्यांचे आयोजन श्रीलंका करेल. अ आणि ब गटातील सामने संपल्यानंतर ६ सप्टेंबरपासून त्यातील सुपर ४ दरम्यान सामने सुरू होतील. सुपर फोरच्या शेवटी दोन आघाडीच्या संघांमध्ये कोलंबो येथे १७ सप्टेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. आशिया चषक हा भारताच्या ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीसाठी महत्त्वाचा बेंचमार्क असेल आणि निवडकर्त्यांना विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात मदत करेल.
आशिया चषकसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसीध कृष्णा, राखीव खेळाडु संजु सॅमसन.