
टीम इंडियाने आज फायनल सामन्यात पहिली बॅटिंग करताना निराश केलं. रोहित शर्मा, विराट कोहली आणि राहुलचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी गुडघे टेकले. त्यामुळे फायनलच्या महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला वरचढ होण्याची संधी मिळाली आहे.
अहमदाबाद- टीम इंडियाने सेमीफायनलपर्यंत जबरदस्त खेळ दाखवला. पण फायनलमध्ये पहिली बॅटिंग करताना टीम इंडियाला प्रभाव पाडता आला नाही. आज टॉस हरल्यानंतर ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सने आपल्याला फलंदाजीची संधी दिली. टॉस जिंकल्यानंतरही आपण फलंदाजीच घ्यावी अशी अपेक्षा असती. पण सेमीफायनलप्रमाणे आज पहिल्या फलंदाजीचा आपल्याला फायदा उचलता आला नाही. कॅप्टन रोहित शर्माने नेहमीप्रमाणे टीम इंडियाला धुवाधार सुरुवात करुन दिली. मिचेल स्टार्क, हेझलवूडच्या गोलंदाजीवर धावा वसूल केल्या. शुभमन गिलच्या रुपाने टीम इंडियाला पहिला धक्का बसला. तो 4 रन्सवर बाद झाला. स्टार्कच्या गोलंदाजीवर झम्पाकडे कॅच दिली. त्यावेळी टीम इंडियाची धावसंख्या 30 होती.
रोहित शर्माच्या रुपाने टीम इंडियाची दुसरी विकेट गेली. ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात हेडने रोहितचा कॅच घेतला. हा खूप अप्रतिम झेल होता. उलट पळत जाऊन त्याने कॅच पकडली. 31 चेंडूत 47 धावा करुन रोहित पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 4 चौकार, 3 सिक्स मारले. त्यानंतर पाच धावांच्या अंतराने मागच्या सामन्यातील शतकवीर श्रेयस अय्यर आऊट झाला. कमिन्सच्या अप्रतिम चेंडूवर त्याने विकेटकीपरकडे झेल दिला. त्याने 4 रन्स केल्या. तीन विकेट गेल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांवर दबाव आला. विराट कोहली आणि केएल राहुलने संथ संय़मी फलंदाजी सुरु केली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. दोघे विकेटवर असताना अपवादने एखादा चौकार निघाला असेल.
▪️विजयासाठी किती धावांचे लक्ष्य?
विराट कोहली सेट झाला होता. पण पॅट कमिन्सच्या चेंडूवर तो बोल्ड झाला. त्याने 63 चेंडूत 54 धावा केल्या. यात 4 चौकार होते. विराट आऊट झाल्यानंतर टीम इंडियाला जणू घसरणच लागली. एका टोकाकडून पाय रोवून फलंदाजी करणाऱ्या केएल राहुलचा विकेटही स्टार्कने काढला. त्याने 107 चेंडूत 66 धावा केल्या. राहुलने फक्त 1 फोर मारली. त्यानंतर रवींद्रा जाडेजा (9), मोहम्मद शमी (6) आणि जसप्रीत बुमराह (1) रन्सवर तंबूत परतले. एकाबाजूने विकेट जात असल्यामुळे सूर्यकुमार यादवला सुद्धा आपला नैसर्गिक आक्रमक खेळ दाखवता आला नाही. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. डावाच्या अखेरीस कुलदीप यादव (10) आणि मोहम्मद सिराजने (9) टिकून फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कशीबशी टीम इंडिया 240 पर्यंत पोहोचली आहे.