जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | फेब्रुवारी ०७, २०२३.
देवरूख शाळा क्र. ४ चे शिक्षक व पूर गावचे रहिवासी श्री. संदेश झेपले यांना रत्नागिरी येथे पार पडलेल्या निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. यामुळे त्यांच्यावर देवरूख परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भारतीय जनयत पार्टी, दक्षिण रत्नागिरी यांच्यावतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मोदींची लोकप्रियता व त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणारी देशाची वाटचाल यावर प्रेरित होऊन दक्षिण रत्नागिरीतील शेकडो स्पर्धकांनी खुल्या गटामध्ये झालेल्या या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. श्री. संदेश झेपले यांनी ‘आपले पंतप्रधान: नरेंद्र मोदी एक अंगार’ या विषयावर निबंध लिहला होता. त्यांचा हा निबंध तज्ञ परीक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यांना उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण रत्नागिरी येथे भाजपा जिल्हाध्यक्ष दिपकजी पटवर्धन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी श्री. झेपले यांना प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवून गौरविण्यात येणार आहे. शिवाय बक्षिस पात्र निबंध प्रकाशित केले जाणार आहेत. असे स्पर्धेचे संयोजक श्री. निलेश आखाडे यांनी सांगितले.
संदेश झेपले यांनी यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये सुयश मिळवले आहे. त्यांना निबंध स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, लेख स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी स्पर्धांमध्ये तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील बक्षिसे मिळाली आहेत. त्यांना जिल्हा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार, अरण्यपुत्र एकलव्य पुरस्कार, साहित्य रत्न पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. हे त्यांचे निबंधाचे २९ वे पारितोषिक आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे आई वडील, पत्नी तसेच मित्र परिवार अशा सर्वांकडूनच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संभाजी पाटील, सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन कमिटी पदाधिकारी यांनीही श्री. संदेश यांचे अभिनंदन केले आहे.