टाटा समूहाच्या या गुंतवणुकीतून थेट १,६५० नोकऱ्या निर्माण होणार आहेत…
संरक्षण विभागाला आवश्यक असलेली ६७ टक्के विमाने आणि हेलिकॉप्टर कर्नाटकात तयार होतात.
बंगळूर : ‘टाटा’ समूहाचा (Tata Group) भाग असलेल्या एअर इंडिया आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स राज्यातील विविध प्रकल्पांसाठी २३ हजार ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार आहेत. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्या उपस्थितीत राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला.
अवजड आणि मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील (M. B. Patil) यांच्या नेतृत्वाखाली उद्योग विभागाचे प्रधान सचिव सेल्वकुमार आणि एअर इंडियाचे मुख्य वाणिज्य अधिकारी निपुण अग्रवाल आणि टीएएसएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकरण सिंग यांनी सामंजस्य करारांची देवाणघेवाण केली. सरकारचे मुख्य सचिव रजनीश गोयल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव एल. के. अतिक, उद्योग आयुक्त गुंजन कृष्णा आणि इतर वरिष्ठ अधिकारी आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विधानसौध येथे झालेल्या करारांच्या देवाणघेवाणीनंतर बोलताना एम. बी. पाटील म्हणाले, ‘टाटा समूहाच्या या गुंतवणुकीतून थेट १,६५० नोकऱ्या निर्माण होणार आहेत. एकूण गुंतवणुकीपैकी एअर इंडियाने बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमान देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हर-हॉल (एमआरओ) युनिट उभारण्यासाठी १३०० कोटींची गुंतवणूक करत आहे. त्यामुळे १,२०० लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल आणि २५ हजारांहून अधिक रोजगार अप्रत्यक्षपणे निर्माण होतील.
टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (टीएएसएल) तीन प्रकल्पांसाठी १,०३० कोटी गुंतवणूक करेल. यापैकी ४२० कोटी नागरी विमानांचे मालवाहतूक विमानात रूपांतर करण्यासाठी युनिट उभारण्याच्या कामासाठी वापरण्यात येतील. ३१० कोटी व्यतिरिक्त तोफा उत्पादन युनिटमध्ये गुंतवणुकीसह ३०० कोटी ॲरोस्पेस, संरक्षण संशोधन आणि विकास खर्चासाठी हाती घेतले जाईल. यामुळे ४५० रोजगार निर्माण होतील.’’
टीएएसएल कंपनीला आवश्यक..
असलेल्या १३ हजार स्पेअर पार्टसपैकी ५० टक्के पुरवठा बंगळूर विमानतळाजवळ आणि कोलार येथे उभारल्या जाणाऱ्या बंदूक उत्पादन युनिटद्वारे करण्याची योजना आखत आहे. यामुळे ३०० हून अधिक लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये दोन ते तीन हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. बंगळूरमध्ये एचएएलच्या स्थापनेपासून १९३९ पासून राज्य विमान वाहतूक क्षेत्रात आघाडीवर आहे.
६७ टक्के विमाने, हेलिकॉप्टरची निर्मिती..
संरक्षण विभागाला आवश्यक असलेली ६७ टक्के विमाने आणि हेलिकॉप्टर कर्नाटकात तयार होतात. याशिवाय, देशाच्या ॲरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील निर्यात उलाढालीत राज्याचा वाटा ६५ टक्के आहे. देशातील या क्षेत्रातील ७० टक्के कंपन्या कर्नाटकात आहेत.