
मुंबई :- राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी शिवसेनेत बंड केलं आणि राज्यातील सरकार कोसळलं. तेव्हापासून बंड केलेल्या समर्थक आमदार आणि खासदारांनी अनेक गौप्यस्फोट केले. काही दिवसांपूर्वी शिंदे समर्थक आणि आत्ताचे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. २०१९ पासून २ वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री तानाजी सावंत यांच्यात सत्ता परिवर्तन करण्यासाठी १०० ते १५० बैठका झाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून मी धाराशिव जिल्हा परिषदेत राज्यातील पहिले बंड केले आणि भाजप शिवसेनेची सत्ता आणली. फडणवीस यांच्यासोबत मी बैठका घेत होतो. मी जे बोलतो ते करुन दाखवतो असं त्यांनी म्हंटलं होतं. त्यांच्या त्या व्यक्तव्याचा चांगलाच समाचार ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतला आहे.
सुषमा अंधारे बोलताना म्हणाल्या की, “मंत्री तानाजी सावंत हे त्यांना मिळालेल्या मंत्रीपदावर खूश नाहीत त्यांना कदाचित मुख्यमंत्री पदाची खुर्ची हवी आहे”. त्यांना हे सांगायचं असेल की एकनाथ शिंदे यांच्यात सत्तापरिवर्तनाची धमाक, हिम्मत नव्हती. एकनाथ शिंदे यांनी सत्तांतरणासाठी काही केले नाही. जे काही केले ते मी १५० बैठका घेऊन केले.. हे त्यांना सांगायचं असेल, अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.परभणीचे पालकमंत्री तानाजी सावंत सांगतात मी १५० बैठका फडणवीसांसोबत घेतल्या. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारीं यांच्यापेक्षा मी मोठी सभा पंढरपूर येथे घेतली असे मंत्री सावंत म्हणत आहेत, याचीही अंधारेंनी भाषणावेळी आठवण करून दिली आहे.