3 मे/रत्नागिरी- ऑलिम्पियाड गणित स्पर्धा परीक्षेतील सुवर्णपदक विजेत्या शिवानी धनंजय पटवर्धन हिचा राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूलमध्ये नुकताच सत्कार करण्यात आला. या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या आठवी आणि दहावी मधील 23 विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
श्री. लोवलेकर यांनी विद्यार्थ्यांचा कौतुक केले आणि भविष्यकाळात अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भरपूर कष्ट घेऊन अभ्यास करून यशस्वी व्हा अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. विज्ञान विषयाच्या दृष्टिकोनातून काही मार्गदर्शन हवे असल्यास मार्गदर्शन करण्याचा मानस व्यक्त केला
ऑलिम्पियाड गणित स्पर्धा परीक्षेला मार्गदर्शन करणारे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे गणित विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. राजीव सप्रे यांनी सांगितले की, शिवानी पटवर्धन या विद्यार्थिनीने ऑलिम्पियाड गणित स्पर्धा परीक्षेमध्ये सुवर्णपदक मिळवून उत्तम यश मिळवण्याची परंपरा सुरू केली. ती परंपरा पुढील विद्यार्थ्यानी तिच्याकडून प्रेरणा घेऊन अखंड चालू ठेवावी अशी अपेक्षा डॉ राजीव सप्रे यांनी व्यक्त केली.
मुख्याध्यापिका पूजा कात्रे म्हणाल्या की , शिवानीने पुढेही वारकऱ्यांसारखी आपली गणिती ज्ञानवारी अखंड चालू ठेवावी अशी इच्छा व्यक्त करत शिवानी पटवर्धन हिला शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले.