संगमेश्वर- धामणी येथील रेल्वे स्थानकावर मडगाव, जामनगर, पोरबंदर एक्स्प्रेसला थांबा मिळावा यासाठी निसर्गरम्य संगमेश्वर ग्रुपतर्फे गेली दीड वर्षे रेल्वे प्रशासनाविरोधात लढा सुरू आहे. मात्र अद्यापही मागणी पूर्ण झाली नसल्याने संगमेश्वर निसर्ग ग्रुप तर्फे पुन्हा आज प्रजासत्ताक दिनी धामणी रेल्वे स्थानकावर लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गोड बोलून वेळ काढली, म्हणून आमच्यावर आंदोलनाची वेळ आली
संगमेश्वरच्या जनतेने पक्क केलय, प्रशासनाला आता चोहोबाजूंनी घेरलय
अशा आशयाचे फलक झळकावत तालुक्यातील अनेक नागरिक संगमेश्वर धामणी येथील रेल्वे स्थानकावर भर उन्हात उपोषणाला बसले आहेत. गेली अनेक वर्षे केवळ आश्वासनापलीकडे रेल्वे प्रशासनाने काहीच केले नाही. रेल्वेच्या आडमुठे धोरणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या उपोषणाला आज सकाळी सुरुवात झाली. अनेक गावातील नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपला रोष व्यक्त केला आहे.