देवरूख- रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी स्वप्नील केशव जाधव (वय-३५, रा. मिऱ्या, रत्नागिरी) यांचे आज रविवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अकाली निधनाबद्दल पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्वप्नील जाधव हे रत्नागिरी नजीकच्या मिऱ्या गावचे रहिवासी असून ते सध्या संगमेश्वर पोलीस ठाणे येथे पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. गेली तीन वर्षे ते संगमेश्वर पोलीस ठाणे येथे अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावत होते. स्वप्नील जाधव यांनी आपल्या प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाने सर्वांनाच आपलेसे केले होते. पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सर्वांशी ते प्रेमाने वागत असत. आज रविवारी सकाळी त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले.
लागलीच त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी नेण्यात येत होते. मात्र आंबा घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या दख्खनजवळ त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार व पोलीस कर्मचाऱ्यांनी साखरपा येथे धाव घेतली. दरम्यान, डाँक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी स्वप्नील जाधव यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांचे पार्थिव रत्नागिरी मिऱ्या येथे नेण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, लहान भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.