जिल्ह्यात सर्वत्र कार्यालयांची स्वच्छता
रत्नागिरी(जिमाका) : वेळ सकाळी ७ ची.. स्थळ जिल्हाधिकारी कार्यालयातील १०० फुटी ध्वजस्तंभ.. प्रत्येकाच्या हातात झाडू..प्लास्टीकच्या बाटल्या, कागद, कपटे, अनावश्यक वाढलेली झाडे.. बघता बघता कचऱ्याचा ढिग जमू लागला..
प्रत्येकजण झपाटल्यासारखा साफसफाई करत होता. यामध्ये जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी डॉ. जस्मिन, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, प्रांताधिकारी जीवन देसाई, प्रांताधिकारी विजय सूर्यवंशी यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
औचित्य होते स्वच्छता पंधरवडा, महात्मा गांधी जयंती निमित्ताने ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्ग कार्यालयीन स्वच्छतेचे..उद्या रविवारी पुन्हा ‘एक तारीख, एक तास’ निमित्ताने शहर परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे.आज अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. यात महिला अधिकारी, कर्मचारीही आघाडीवर होत्या.