
जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | एप्रिल ११, २०२३.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने रत्नागिरी शहरामध्ये शिवसेना-भाजपा युतीच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे उद्या दि. १२ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ०५:०० वाजता रत्नागिरी कारागृहापासून स्वा. सावरकर यात्रेची सुरवात होईल. मुख्य रस्त्याने डॉ. आंबेडकर पुतळा, जयस्तंभ, एस.टी.स्टँन्ड, राम आळी, गोखले नाका, सावरकर पुतळा, स्वातंत्र्य लक्ष्मी चौक असा या यात्रेचा मार्ग असणार आहे. यात्रा स्वातंत्र्य लक्ष्मी चौक येथे पोचल्यावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान स्वातंत्र्य लक्ष्मी चौक मैदानामध्ये स्वा. सावरकरांच्या गीतांचा व महाराष्ट्र स्फूर्ती गीतांचा “जयोस्तुते” हा कार्यक्रम होणार आहे.
यात्रेमध्ये महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेना भाजपाचे अनेक नेते सहभागी होणार आहेत. स्वा. सावरकरांवरील चित्ररथ, ढोलपथके याचबरोबर विविध मंदिरांचे विश्वस्त, विविध संस्थांचे प्रतिनिधी, स्वा. सावरकरप्रेमी नागरिक यांच्यासह शिवसेना – भाजपाचे कार्यकर्ते अत्यंत उत्साहात या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.
रत्नागिरी ही तर स्वा. सावरकरांची कर्मभूमी! इथल्या विशेष कारागृहातील कोठडीमध्ये कारावासही भोगला. त्यांच्या विनंतीवरून दानशूर भागोजीशेठ किर यांनी पतित पावन मंदिर बांधले आणि सहभोजनाचा परिपाठ सुरू केला व हे मंदिर सर्वांसाठी खुले केले. रत्नागिरीकरांसाठी स्वा. सावरकर आणि स्वा. सावरकरांचे विचार हे सदैव प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहेत.
स्वा. सावरकरांच्या या कर्मभूमीमध्ये होत असलेल्या स्वा. सावरकर गौरव यात्रेमध्ये समस्त रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन आणि शिवसेना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.