
चिपळूण (प्रतिनिधी) : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडियम स्कूल, चिपळूण येथे दिनांक १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आली. गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करणारा आणि विद्यार्थ्यांच्या कृतज्ञतेचे भावनिक दर्शन घडवणारा हा कार्यक्रम विद्यालयाच्या आवारात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुण्या सौ. ज्योती परांजपे उपस्थित होत्या. त्यांच्या परिचयाचे सादरीकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. संगीता जोशी यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात भगवद्गीतेच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
इयत्ता आठवी ‘अ’च्या विद्यार्थ्यांनी “गुरुने दिला ज्ञानरूपी वसा” ही प्रार्थना सादर केली. माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व सांगणाऱ्या प्रेरणादायी गोष्टींच्या माध्यमातून श्रोत्यांचे मन जिंकले.
कार्यक्रमातील प्रमुख वक्त्यांनी भगवद्गीतेतील सर्व अध्यायांचा सारांश उलगडत जीवनातील त्याचे महत्त्व विशद केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे यांनी गुरुपौर्णिमेचे मर्म सांगताना गुरुंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना भेटवस्तू देऊन आदरांजली अर्पण केली, तर काही विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्य नात्यावर आधारित वेशभूषा साकारून वातावरण अधिक भारावून टाकले.
कार्यक्रमात इयत्ता सहावी ‘ब’ ची विद्यार्थिनी स्वरदा खोत हिचा विशेष गौरव करण्यात आला. तिने शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागात जिल्हास्तरावर २१वा, तर तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली. तिचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम विभाग प्रमुख व सहाय्यक शिक्षिका सौ. स्नेहा भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सूत्रसंचालन दहावी ‘अ’ चा विद्यार्थी पियुष पवार, तर आभार प्रदर्शन अर्णव चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमास प्रशालेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यामुळे गुरुपौर्णिमा साजरी करताना गुरु-शिष्य परंपरेचे अध्यात्मिक आणि शैक्षणिक महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात ठसवले गेले.