उद्योजक सतीश वाघ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुप्रिया हाऊस संशोधन केंद्राचा शनिवारी शुभारंभ
सुप्रिया हाऊस संशोधन केंद्राची अद्ययावत वास्तू छायाचित्रात दिसत आहे.
चिपळूण – लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड कंपनीचे चेअरमन सतीश वाघ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुप्रिया हाऊस संशोधन केंद्राचे २५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या संशोधन केंद्राच्या अद्ययावत वास्तूत यापुढे सुप्रिया लाईफ सायन्स या कंपनीचे औद्योगिक क्रांती घडवणारे विकासात्मक अनेक प्रकल्प भविष्यात आरंभ होतील, असा विश्वास औद्योगिक क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केला आहे. सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीच्या माध्यमातून चेअरमन सतीश वाघ यांनी सामाजिक बांधिलकीतून जनतेसाठी अनेक हितकारक उपक्रम राबवले आहेत याशिवाय दातृत्वाची भावना देखील कायम जपली आहे. कोरोनाच्या संकटातही सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीचे चेअरमन सतीश वाघ यांनी दातृत्वाच्या भावनेतून शासकीय यंत्रणांना मदतीचा हात देत केलेली अलौकिक कामगिरी कौतुकास पात्र ठरली आहे.
याशिवाय गरजूंनाही मदतीचा हात देण्यासाठी ते नेहमीच अग्रस्थानी असतात. उद्योग क्षेत्रात केलेल्या दमदार कामगिरीची दखल घेत त्यांना आजवर राष्ट्रीय स्तरासह परदेशातील अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. सुप्रिया हाऊस संशोधन केंद्राची अद्ययावत उभारणी करत नवे दालन देखील खुले करून दिले आहे. या सुसज्ज दालनाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, माजी मंत्री आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम,सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड कंपनीचे चेअरमन सतीश वाघ यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.