महाराष्ट्राच्या इतर भागांपेक्षा कोकणात तुलनेने सूर्यमंदिरे जास्त प्रमाणात दिसतात. सौर उपासना कदाचित या प्रांती पूर्वापार चालत आली असावी.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे, आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी इथली सूर्यमंदिरे ही तर मोठी देवस्थानेच झालेली आहेत. त्यांचे प्राचीनत्व आणि तिथे येणारा भक्तांचा ओघ यांमुळे यांचे महत्त्व साहजिकच वाढले. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर आरवली, आंबव, गणेशगुळे, नेवरे या स्थानीसुद्धा सूर्यमंदिरे आहेत.आंबव हे गाव पोंक्षे आंबव या नावाने ओळखले जाते. याचे कारण समस्त पोंक्षे मंडळी याच गावाची आहेत. गावाच्या मध्यभागी पूर्वाभिमुख असलेले इथले सूर्य मंदिर आणि त्याच्या चारही बाजूंनी असलेले मोकळे प्रांगण इथल्या परिसराची शोभा वाढवते. मंदिराच्या गाभाऱ्यात संगमरवरी दगडातून घडवलेली सूर्यमूर्ती आहे. इथली मूळ मूर्ती सन १८२१साली बदलली गेली. आणि तीच मूळ मूर्ती आरवली गावच्या श्री आदित्यनारायण मंदिरात स्थापिली गेली. सध्याच्या मूर्तीच्या डाव्या हातात शंख आणि उजव्या हातांतचक्र आहे. खरेतर सूर्याच्या दोन्ही हातात कमळे असायला हवीत. सूर्यमूर्तीची ती व्यवच्छेदक लक्षणे आहेत. मात्र इथे शिल्पकाराने आपल्या बुद्धीने शंख आणि चक्र केलेले असावेत. असो. ही मूर्ती एका कमळात बसलेली असून ते कमळ सात घोड्यांच्या रथात आहे. इथे रथाचे सारथ्य करणारा अरुणसुद्धा दाखवला आहे.पूर्वी या गावी पोंक्षे यांची ६ घराणी होती. प्रत्येकजण एक दिवसदेवाची पूजा करायचा. या पद्धतीला ‘सहाव्या’ असे म्हणत असत.आठवड्यातील ७वा दिवस हा सर्वांचा. इथल्या सूर्यमूर्तीवर सौर अभिषेक केला जातो.