
चिपळूण : तालुक्यातील कालुस्ते बुद्रुक येथील बौद्धवाडीमध्ये राहणाऱ्या एका १७ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मृत युवतीचे नाव आकांक्षा आदेश पवार (वय १७) असे असून, तिने राहत्या घराच्या बेडरूममध्ये सिलिंग फॅनला साडी बांधून गळफास लावून आपले आयुष्य संपवले. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला.
त्यावेळी घरात तिची आई, आजी आणि बहीण उपस्थित होत्या. आकांक्षा गळफास घेतल्याचे दृश्य पाहताच तिच्या बहिणीला धक्का बसून ती बेशुद्ध पडली. कुटुंबीयांनी तात्काळ चिपळूण पोलिसांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.