
देवरूख- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचा विद्यार्थी ओंकार किरण गुरव (द्वितीय वर्ष, विज्ञान) याची राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करताना युवा संसदेमध्ये सचिव पद भूषविले. राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत युवा संसदमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक ओंकार गुरव याला मिळाली. या युवा संसदेमध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनीची निवड करण्यात आली होती.
युवा संसदेमधील मतदान निवडीच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक स्वयंसेवकाला विविध प्रकारच्या जबाबदारीची वाटप केले गेले होते. यामध्ये ओंकार गुरव याला सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली होती. भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी यांच्या अंतर्गत ओंकार याला सचिवाची भूमिका पार पाडायची होती आणि त्यांनी ती योग्य प्रकारे पार पाडली. यानंतर सर्व प्रकारची बिल हाताळण्याची जबाबदारी देखील देण्यात आली. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी त्याच्यावरती होती.
या सर्व उपक्रम प्रक्रियेत ओंकार याला महाराष्ट्राचे मा. राज्यपाल श्री. रमेश बैस यांना भेटण्याची आणि संवाद साधण्याची संधी मिळाली. ओंकार गुरव याला युवा संसदेतील विविध उपक्रमात उत्तम सहभाग घेतल्याबद्दल मा. राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन गौरविले. ओंकार याला राजभवन आणि विधानभवन या ठिकाणी भेट देऊन, विधिमंडळातील विविध अधिवेशने, बैठका व इतर कामकाज कशा प्रकारे चालते याचे अवलोकन व अध्ययन करून त्या ठिकाणचे कार्य समजून घेता आले. त्याने या युवा संसदेमध्ये युनिसेफच्या डॉ. स्वाती मोहापात्रा, डॉ. तानाजी पाटील, राज्य संपर्क अधिकारी राजेंद्र कोठावळे यांच्यासोबत विविध शैक्षणिक व सामाजिक विषयावर चर्चा केली.
ओंकार गुरव याला युवा संसदेतील यशस्वी सहभाग व सादरीकरणाबद्दल महाविद्यालयात छोटेखानी कार्यक्रमात प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सन्मानित केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सुनील सोनवणे, प्रा. धनंजय दळवी उपस्थित होते. ओंकार गुरव याच्या यशाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभूदेसाई, तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
फोटो- ओंकार गुरव याला प्रशस्तीपत्रक प्रदान करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. पाटील आणि प्रा. सोनवणे.