
सातारा- साताऱ्यातील जालिंदर सोळसकर या तरूण शेतकऱ्याने ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. यातून त्याने ७५ लाखांची कमाई केली आहे. या युवा शेतकऱ्याने दोन एकरात १५० टनाहून अधिक उत्पादन घेतले आहे.
सोळशी गाव हे कोरेगाव तालुक्यातील भागात वसलेले गाव आहे. हा भाग प्रामुख्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात पिण्यासाठी पाणी नाही तर शेती कशी करणार म्हणून शेतकरी हैराण झाले आहेत. पण यावर मात करून जिद्द, चिकाटी असली तर अशक्य ही शक्य करू शकतो हे जालिंदर सोळसकर या युवा शेतकऱ्याने ढोबळी मिरचीचे उत्पादन घेऊन करून दाखवले आहे. जालिंदर सोळसकर यांनी डीप इरिकेशन करून, पेपर मिलिशन, स्टेजिंग करून कमी पाण्यामध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. ढोबळी मिरचीची लागवड करून ५ महिने झाले. या ५ महिन्यांमध्ये १३ वेळा तोडणी झाली आहे.

जवळपास एका तोडणीमध्ये चक्क १३ टन ढोबळी मिरचीच्या मालाची तोडणी दुष्काळी भागातील शेतकऱ्याने केली आहे. आजपर्यंत १५० टन मालाची तोडणी करून ती विक्री देखील जालिंदर सोळसकर यांनी केली आहे. दोन एकरामध्ये घेतलेल्या ढोबळी मिरचीचा दर हा ६० रुपये तर कधी ७० रुपये किलो असा होता आणि आजचा भाव धरला तर ४० ते ४५ रुपये किलो एवढा आहे. या सर्वाची सरासरी पकडून दर ५० रुपये एवढा धरला, तर ७५ लाख रुपये एवढे उत्पन्न २ एकरामध्ये ढोबळी मिरचीमधून मिळाले आहे. या मिरचीच्या लागवडीचा खर्च १० लाख रुपये झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला ६५ लाख रुपये एवढा निव्वळ नफा या मिरचीच्या लागवडीमुळे मिळाल्याचे जालिंदर सोळसकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी जर कामाचे नियोजन, पिकाचे नियोजन आणि दराचे नियोजनाचा अभ्यास करून शेती केली आणि त्याचबरोबर भागातील सर्व शेतकरी एकत्र येऊन शेती केली तर शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा या शेतीतून होऊ शकतो, असा देखील कानमंत्र सोळसकर यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.